आपलं फलटण: प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मोबाईल ॲप्लिकेशनचे प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कृषिकन्यांनी विविध कृषी ॲप्सची माहिती देत शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज, तज्ज्ञांकडून पिकसल्ला, कीड व रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन तसेच पीक उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेली माहिती मोबाईलद्वारे सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तसेच शेतीतील विविध समस्यांवर उपाय शोधणे, शासकीय योजनांची अद्ययावत माहिती मिळविणे आणि कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाशी जोडले जाणे यासाठी या ॲप्सचा मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रात्यक्षिकाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून ॲप्लिकेशनचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नीतीषा पंडित तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यशस्वी आयोजनासाठी कृषिकन्या साक्षी नाझीरकर, श्रावणी भागवत, अस्मिता नेवसे, विद्या नवले, गौरी जाधव, मोनाली कोळपे आणि जोगेश्वरी लोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.





