फलटण (आपलं फलटण) तालुक्यातील मौजे दुधेबावी येथील राखीव वन गट क्रमांक 843 मधील अतिक्रमणावर वनविभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत अनधिकृतपणे तयार करण्यात आलेला रस्ता हटवून संपूर्ण क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनक्षेत्रातील अतिक्रमणाविरोधात वनविभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा अहवाल क्रमांक 02/2025 दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी नोंदविण्यात आला होता. भारतीय वन अधिनियम 1927 मधील कलम 26(1) आणि 26(4) नुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर 15 एप्रिल 2026 रोजी भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीनुसार संबंधित क्षेत्राची हद्द निश्चित करण्यात आली होती.
याच हद्दनिश्चितीच्या आधारे सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात आली. उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एन. आर. बोटेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपरिमंडळ अधिकारी एन. एन. जगदाळे यांच्यासह फलटण, वडूज, दहिवडी, कोरेगाव आणि सातारा येथील फिरत्या पथकातील कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
कारवाईदरम्यान एक पोकलेन व दोन जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने अनधिकृत रस्ता हटविण्यात आला. वनविभागाने ही कारवाई शासनाच्या नियमांनुसार पार पकडल्याचे स्पष्ट करत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले. संबंधित जागा पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून सुमारे 20 गुंठे वनक्षेत्रावर समतल चरही (सीसीटी) काढण्यात आले आहेत.
दरम्यान, राखीव वनक्षेत्रात अनधिकृत प्रवेश, साफसफाई किंवा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर वनकायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी एक वर्षांपर्यंत कारावास, पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचेही विभागाने स्पष्ट केले.







