फलटण : आपलं फलटण :विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारा, ज्ञानाचा प्रकाश देत भावी पिढीचे भविष्य घडविणारा आणि समाजाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारा शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा नसून समाजाचा खरा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी आयुष्यभर समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणे ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. याच भावनेतून फलटण तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा सन्मान करणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
‘शिक्षकांचे स्थान गुरूस्थानी असून फलटण तालुक्यातील शिक्षकांचा गौरव ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,’ असे गौरवोद्गार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी काढले.

जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण यांच्या अंतर्गत आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी जाधववाडी येथील सजाई गार्डनमध्ये पार पडला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते, आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, विष्णू लोंखडे, ऋतुजा जगताप, किरण नलवडे, विकास नाळे, सचिन अभंग, सीमा भोईटे, वनिता आढाव, शुभांगी शिंदे, पंचायत समिती सदस्य, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, विक्रम आप्पा भोसले, जयकुमार शिंदे, सुदाम (आप्पा) मांढरे, अमोल सस्ते, संजय कापसे, गटविकास अधिकारी ए. एम. घावटे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

फलटण तालुक्यात सन २०२३-२४ पासून तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रलंबित होते. मागील चार वर्षांतील पुरस्कारांचे वितरण या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले. तालुक्यातील २२ केंद्रांमधून प्रत्येकी चार ते पाच शिक्षकांची निवड करून एकूण ९४ शिक्षकांचा, तीन केंद्रप्रमुखांचा तसेच राज्य व जिल्हास्तरावरील शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. अनेक वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानातून उभ्या राहिलेल्या कार्याचा हा सन्मान असल्याने पुरस्कारार्थी शिक्षकांसाठी हा क्षण विशेष आनंदाचा ठरला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन त्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. त्यामुळे मानवी जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. पंचायत समितीच्या सभापती या नात्याने फलटण तालुक्यातील शिक्षकांचा गौरव करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिक्षकाचा प्रवास हा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा नसतो, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला ओळखून त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा असतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणे, नव्या शैक्षणिक प्रयोगांचा स्वीकार करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि ज्ञानासोबतच संस्कारांची शिदोरी विद्यार्थ्यांना देणे, अशा अनेक जबाबदाऱ्या शिक्षक पार पाडत असतात. शिक्षकांच्या याच निष्ठेवर आणि परिश्रमांवर उद्याचा समाज उभा राहत असतो.
पुरस्कार म्हणजे शिक्षकांच्या कार्याचा केवळ सन्मान नव्हे, तर त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मिळणारी प्रेरणाही आहे. एका शिक्षकाच्या कार्याचा गौरव अनेक शिक्षकांना नवे प्रयोग करण्याची, विद्यार्थ्यांसाठी अधिक समर्पित भावनेने काम करण्याची आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे फलटण तालुक्यातील या पुरस्कार सोहळ्याने शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मठपती यांनी केले, तर केंद्रप्रमुख राजेंद्र कुंभार यांनी आभार मानले.






