शासनाचा आनंदाचा शिधा बंद; विडणीत मात्र अभंग कुटुंबीयांकडून दीड हजार कुटुंबांची दिवाळी गोड! सामाजिक बांधिलकीतून जपली ग्रामकुटुंबाची भावना
फलटण :आपलं फलटण :दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा सण! मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सणाचा आनंद मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही, अशा कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा सामाजिक उपक्रम विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राबविला आहे. शासनाकडून आनंदाचा शिधा वाटपाची योजना बंद झाली असली, तरी गावातील प्रत्येक कुटुंब हेच आपले कुटुंब मानून अभंग परिवाराने स्वतःच्या पुढाकारातून सुमारे दीड हजार कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचविला. केवळ सणाच्या शुभेच्छा न देता प्रत्यक्ष मदतीतून दिवाळीचा आनंद वाटण्याचा हा उपक्रम विडणीच्या सामाजिक जीवनात वेगळा ठसा उमटविणारा ठरला आहे.

‘माझे कुटुंब म्हणजे संपूर्ण गाव’ ही भावना मनाशी बाळगून सागर अभंग यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला. गावातील गरीब, सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, घराघरांत गोडवा निर्माण व्हावा आणि कोणतेही कुटुंब सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. विशेषतः दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली आहे.
विडणी येथील सोसायटी रेशनिंग दुकान तसेच ग्रामपंचायत येथे मंगळवार, दि. ३ नोव्हेंबरपासून आनंदाच्या शिधा वाटपाला सुरुवात करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या समवेत त्यांच्या पत्नी तथा नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. अमृता सागर अभंग आणि अभंग परिवाराने या उपक्रमात सहभाग घेतला. सुमारे दीड हजार कुटुंबांपर्यंत शिधा पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणजे गावातील प्रत्येक घटकाला उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेण्याची सामाजिक जाणीव असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
सागर अभंग हे केवळ ग्रामपंचायतीच्या कामकाजापुरते मर्यादित न राहता गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असतात. गणेशोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, तर नवरात्रोत्सवात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा, गरबा आणि दांडियाचे आयोजन करून त्यांनी गावातील महिला, युवक आणि नागरिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सव हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता त्यातून गावातील एकोपा, सहभाग आणि सामाजिक सलोखा वाढावा, अशी भूमिका त्यांच्या विविध उपक्रमांतून दिसून येते.
दिवाळीच्या निमित्ताने अभंग परिवाराने केलेल्या या उपक्रमाचे महत्त्व केवळ शिधा वाटपापुरते मर्यादित नाही. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील नाते हे केवळ निवडणुकीपुरते किंवा प्रशासकीय कामकाजापुरते नसून सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे असावे, हा सामाजिक संदेश या कृतीतून पुढे आला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्याची भावना आणि त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याची कृती यामुळे विडणीतील या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे. अभंग दाम्पत्य आणि त्यांच्या परिवाराच्या या सामाजिक योगदानाबद्दल ग्रामस्थांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.
दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, त्याचप्रमाणे आनंदाचा गोडवा प्रत्येक कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचावा, हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. समाजहिताची भावना केवळ भाषणातून नव्हे, तर कृतीतून व्यक्त होते, याची प्रचिती विडणीतील या उपक्रमाने दिली आहे.






