फलटण : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात तात्पुरते फटाका विक्री स्टॉल उभारू इच्छिणाऱ्या विक्रेत्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत परवान्यासाठी अर्ज सादर करावेत. विनापरवाना फटाका विक्री करणे, निर्धारित जागेव्यतिरिक्त अन्यत्र स्टॉल उभारणे अथवा परवान्यातील अटींचे उल्लंघन करणे महागात पडणार असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिला आहे.

फटाका विक्रीसाठी संबंधित पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा परवान्यासाठी विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निर्धारित जागेतच स्टॉल उभारणे बंधनकारक
फलटण शहरात नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागेत, तर ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपी बिगरशेती जागेतच फटाका विक्री स्टॉल उभारता येतील. परवानगी देताना घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक स्टॉलमध्ये अग्निशमन प्रतिबंधक साहित्य आणि अग्निशमन यंत्र उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे. परवान्याची प्रत दुकानात सहज दिसेल अशा ठिकाणी लावावी.

नियमभंग केल्यास साठा जप्त, दुकान सील
विनापरवाना फटाका विक्री, अनधिकृत ठिकाणी स्टॉल उभारणे किंवा परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये फटाक्यांचा साठा जप्त करणे, दुकान सील करणे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करणे यांचा समावेश असू शकतो.
तालुक्यात कोठेही अनधिकृत फटाका विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तहसील कार्यालय, फलटण शहर पोलीस ठाणे, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे किंवा लोणंद पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुरक्षित दीपावलीसाठी नागरिकांनीही घ्यावी खबरदारी
फटाक्यांच्या विक्रीसोबतच त्यांच्या वापरातील सुरक्षितताही महत्त्वाची आहे.

नागरिकांनी फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, लहान मुलांवर देखरेख ठेवावी आणि ध्वनी व वायुप्रदूषण कमी होईल याची दक्षता घ्यावी. कोणतीही दुर्घटना घडू नये आणि दीपावलीचा सण सुरक्षित व पर्यावरणपूरक वातावरणात साजरा व्हावा, यासाठी विक्रेते आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.






