फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत फलटण तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ व रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर तसेच निसर्गरक्षण व संवर्धन प्रभातफेरी आयोजित करण्यात आली आहे. रक्तदानातून गरजूंचे प्राण वाचविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुथोजी क्लब ग्राउंड, महात्मा फुले चौक, फलटण येथे महारक्तदान शिबिर होणार आहे. ‘आपल्या रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो’ या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता निसर्गरक्षण व संवर्धन प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. या प्रभातफेरीत चायनीज मांजाविरोधी जनजागृती तसेच चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात येणार असून, पर्यावरण संरक्षण, पक्षी व प्राणी संवर्धन आणि घातक चायनीज मांज्यापासून नागरिकांनी दूर राहण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता समाजहिताच्या कार्यातून साजरा करण्याचा उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येत आहे. रक्तदान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृती या तीनही माध्यमांतून नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या उपक्रमात सहयोग सोशल फाउंडेशन, रक्षक स्वयंसेवक महिला सामाजिक फाउंडेशन, नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, क्रांतिसूर्य प्रतिष्ठान, महात्मा शिक्षण संस्था, नृत्यकला अकॅडमी तसेच निसर्गरक्षण व संवर्धन संस्था, फलटण यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचा सहभाग आहे. फलटणकरांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान शिबिर व निसर्ग संवर्धन प्रभातफेरी यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





