फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी) : महावितरण कंपनीने वीज खांबांवरील अनधिकृत फायबर इंटरनेट व केबल टीव्हीच्या केबल्स हटविण्याची मोहीम बुधवारी सकाळी सुरू केल्यानंतर फलटण शहरासह तालुक्यातील अनेक भागांतील ब्रॉडबँड व फायबर इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. बुधवारी सकाळी सुमारे १० वाजल्यापासून गुरुवारीही इंटरनेट सेवा ठप्पच राहिल्याने शासकीय कार्यालये, सेतू केंद्रे, बँका, शैक्षणिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योग तसेच घरातून ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अक्षरशः ठप्प झाले. परिणामी हजारो नागरिकांना दिवसभर मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
महावितरणने दोन दिवसांपूर्वीच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे तसेच इंटरनेट व केबल सेवा पुरवठादारांना नोटिसा बजावत वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स तातडीने हटविण्याचे निर्देश दिले होते. संबंधितांनी स्वतःहून केबल्स न काढल्यास महावितरणकडून कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी प्रत्यक्ष कारवाई सुरू होताच अनेक इंटरनेट सेवा प्रदात्यांनी सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
महावितरणच्या आदेशानुसार वीज खांबांवरील फायबर नेटवर्क हटवून ते ‘बिल्डिंग टू बिल्डिंग’ पद्धतीने स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान काही काळ इंटरनेट सेवा बंद ठेवणे अपरिहार्य असल्याचे संबंधित इंटरनेट सेवा प्रदात्यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई त्यांच्या इच्छेनुसार नसून महावितरणच्या निर्देशांचे पालन करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंटरनेट सेवा बंद पडल्याने आपले सरकार सेवा केंद्रे (सेतू), ऑनलाइन सेवा केंद्रे, सायबर कॅफे, बँका, शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील ऑनलाइन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, आधार पडताळणी, ई-केवायसी, शासकीय योजनांचे अर्ज, विविध ऑनलाइन नोंदणी, डिजिटल पेमेंट, यूपीआय व्यवहार आणि बँकिंग सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसला.
व्यापारी वर्गालाही या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसला. यूपीआय व ऑनलाइन व्यवहार बंद पडल्याने अनेक ठिकाणी व्यवहार खोळंबले. उद्योग, व्यावसायिक कार्यालये आणि ई-सेवांवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचे कामकाज दिवसभर ठप्प राहिल्याने आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज खांबांवर कोणत्याही प्रकारच्या खासगी केबल्स परवानगीशिवाय टाकण्यास मनाई असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून केबल्स टाकण्यात आल्याने वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होत होते. तसेच शॉर्टसर्किट, अपघात आणि जीवितहानीचा धोका वाढत असल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचा दावा महावितरणने केला आहे. अधिकृत भूमिका कायम ठेवत, वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवण्यात येणार नसून नियमांनुसार कारवाई सुरूच राहील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही नागरिकांनी मात्र वेगळी भूमिका मांडत महावितरणच्या कारवाईपूर्वी केबल ऑपरेटर व इंटरनेट सेवा पुरवठादारांमध्ये आवश्यक समन्वय साधला गेला नसल्याची नाराजी व्यक्त केली. पर्यायी व्यवस्था उभी न करता सेवा बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागल्याची भावना व्यक्त होत आहे. काहींनी तर महावितरणवर दबाव आणण्यासाठी काही सेवा पुरवठादारांनी जाणीवपूर्वक सेवा बंद ठेवल्याचाही आरोप केला.
यामुळे संबंधित इंटरनेट सेवा पुरवठादार, केबल ऑपरेटर आणि महावितरण यांनी तातडीने समन्वय साधून इंटरनेट सेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक, विविध संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. महावितरणने शहरासह ग्रामीण भागात वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स हटविण्याची मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे संकेत दिल्याने नियमांचे पालन न करणाऱ्या केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांमध्येही खळबळ उडाली आहे.
दरम्यान केबल्स हटवण्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी त्या केबल्स वीज वाहक खांबांच्या आधाराने पुढे गेले असल्याकारणाने त्या केबल्स काढण्यासाठी अधून मधून वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता इंटरनेट सेवा विस्कळीत त्याचबरोबर वीस पुरवठाही विस्कळीत झाल्याने शहरभर मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले.





