‘
फलटण (पोपट मिंड) हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही आजची सर्वात मोठी जागतिक चिंता बनली असताना, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने फलटणमध्ये सुरू केलेला ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्प पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आशादायी आणि दूरगामी पाऊल ठरत आहे. वन विभागाच्या कार्यालयालगत सुमारे 1.5हेक्टर क्षेत्रात 45 हजार देशी वृक्षांची लागवड करून जैवविविधतेने समृद्ध घनवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, हा प्रकल्प फलटणच्या पर्यावरण इतिहासात हरित पर्वाची नवी सुरुवात मानला जात आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनावर दिलेले प्राधान्य. अनेक ठिकाणी लाखो झाडे लावली जातात; मात्र त्यांचे संगोपन न झाल्याने ती नष्ट होतात. याउलट या प्रकल्पात झाडांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली असून, लावलेले प्रत्येक रोप मोठे वृक्ष बनावे, यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडेकीहाळ यांनी यावेळी बोलताना, फलटणमधील टेकड्या, किल्ले, ओसाड माळराने आणि मोकळ्या जागांवरही अशाच पद्धतीने घनवन प्रकल्प राबविल्यास संपूर्ण तालुका हिरवाईने बहरून जाईल, असा विश्वास व्यक्त केला. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्रपाल निकिता बोटकर यांनी सांगितले की, देशी वृक्षप्रजातींमुळे जैवविविधतेचे संवर्धन, भूजल पातळीत वाढ, मृदसंवर्धन, तापमान नियंत्रण, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल. भविष्यात हा परिसर पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अभ्यासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचाही मानस आहे.

विशेष म्हणजे, अशा दाट घनवनांमुळे पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि विविध वन्यजीवांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होतो. नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत होऊन परिसंस्थेचा समतोल राखला जातो. कार्बन शोषून घेण्याची क्षमता वाढल्याने हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासही अशा प्रकल्पांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे भविष्यात फलटण परिसरातील पर्यावरण अधिक समृद्ध होण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे.

कार्यक्रमास वनपाल नितीन जगदळे, वनरक्षक अर्चना लोखंडे, प्रा. सुधीर इंगळे,पोपट मिंड,ॲड. कांचन खरात, बापू वर्मा, विकास शिंदे, राजेंद्र बोंद्रे , अजय माळवे, योगेश गंगतीरे, गणेश भोईटे , सागर चव्हाण, प्रमोद सस्ते,अमोल पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील पर्यावरण प्रेमी-निसर्ग मित्र मान्यवर उपस्थित होते. नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, ग्लोबल अर्थ फाउंडेशन आणि विविध सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “झाडे लावा, झाडे जगवा” अशी घोषणा देत पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘अटल आनंद घनवन’ हा केवळ वृक्षलागवडीचा उपक्रम नसून पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ हवा, समृद्ध जैवविविधता आणि हरित वारसा निर्माण करण्याचा व्यापक संकल्प आहे. वन विभागाने फलटणमध्ये सुरू केलेले हे मॉडेल राज्यभर राबविण्याची गरज असून, लोकसहभाग आणि प्रभावी संवर्धन यांच्या बळावरच पर्यावरण संरक्षणाची खरी चळवळ यशस्वी होऊ शकते, असा सूर कार्यक्रमात उमटला.





