आपलं फलटण ( योगेश निकाळजे) आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावरील फलटण तालुक्यातील विविध उड्डाणपुलांवर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले स्ट्रीटलाईटचे खांब आजही अंधारात उभे आहेत. कामे पूर्ण होऊन वर्ष दीड वर्षांहून अधिक कालावधी लोटला, एक अपवाद वगळता सर्वच उड्डाणपुलांवरून वाहतूकही सुरू झाली; मात्र पथदिवे अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. परिणामी, रात्रीच्या वेळी उड्डाणपुलांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिवस प्रत्यक्ष सुरू झाले असताना पालखी मार्गावरील उड्डाणपुलांवर दिवे सुरू केले नसल्याने नागरिक, भाविक व वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पालखीची सुरू झाली वारी… पण लाईट नाही खांबावरी,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत
सध्या पालखी महामार्गावरील फलटण बायपासचे काम सुरू असले तरी तालुक्यातील उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे.मार्गावर 10 ते12 ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली असून प्रत्येक पुलावर तसेच दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्यांवर आधुनिक स्ट्रीटलाईट व्यवस्था उभारण्यात आली आहे. या पथदिव्यांचा उद्देश रात्रीच्या वेळी वाहनचालक, पादचारी आणि पुलालगतच्या ग्रामस्थांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात हे दिवे सुरूच नसल्याने संपूर्ण व्यवस्था केवळ शोपीस ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि अवजड वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशामुळे रस्त्यावरील वळणे, पुलावरील अडथळे किंवा इतर धोके वेळेत लक्षात येत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत असून, उड्डाणपुलांवरील अंधार प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांचा प्रश्नही तितकाच रास्त आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेले पथदिवे महिनोनमहिने बंद ठेवायचेच होते, तर त्यांची उभारणी करण्याचा उद्देश काय? सार्वजनिक पैशातून उभारलेली सुविधा वापरातच येत नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा अपव्यय नाही का? विकासकामे केवळ उद्घाटनापुरती आणि कागदोपत्रीच राहणार असतील, तर अशा विकासाचा सर्वसामान्यांना नेमका काय फायदा? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे पालखी मार्गावर उभारलेले प्रत्येक प्रकाशस्तंभाच्या (खांबाच्या)दोन्ही बाजूला लाईटचे दिवे तर टोकावर ज्ञानेश्वर महाराजांच्या कपाळावरील चंदनी टिळ्याची प्रतिकृती ही रचना आकर्षक तर दिसतेच त्याचबरोबर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण करतात. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या प्रवासात हे खांब आधुनिक विकासाचे प्रतीक वाटतात. मात्र प्रत्यक्षात त्यावर एकही दिवा सुरू नसल्याने या विकासकामाला अंधाराची किनार लाभली आहे. “खांब आहेत; पण प्रकाश नाही,” अशी उपहासात्मक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
याबाबत गावोगावच्या नागरिकांनी, प्रवाशांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर वारंवार ही बाब घातली असल्याचे सांगितले जाते. तरीही पथदिवे सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दिवे सुरू न करण्यामागचे नेमके कारण काय, हा प्रश्नही अनुत्तरित आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण तालुक्यात दाखल होण्यापूर्वी तालुक्यातील सर्व उड्डाणपुलांवरील पथदिवे तातडीने सुरू करून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी प्रवासी, वारकरी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे.

चौकट : अंधारात विकासाला अर्थ काय?
उड्डाणपुलांवरील पथदिवे सुरू ठेवणे ही संबंधित प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. विकास म्हणजे केवळ सिमेंटचा रस्ता किंवा उड्डाणपूल नव्हे; तर त्यासोबत सुरक्षिततेची प्रभावी व्यवस्था असणेही तितकेच आवश्यक आहे. पथदिवे उभारून तेच महिनोनमहिने बंद ठेवायचे असतील, तर अशा खर्चाचे औचित्य काय? सार्वजनिक सुरक्षेकडे प्रशासन एवढे उदासीन का आहे? पथदिवे सुरू करणे एवढे अवघड आहे का, की दुर्लक्षाचीच सवय झाली आहे? असे प्रश्न आता जनतेतून जोर धरू लागले असून, पालखीपूर्वी तरी हा अंधार दूर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट :
पाहणी दौऱ्यांतून पथदिव्यांचा अंधार का दिसत नाही?
पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी संबंधित गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील सर्व विभाग एकत्रितपणे काम करतात. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी पाहणी दौरे, आढावा बैठका आणि नियोजनाची मालिका सुरू असते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांपर्यंत सर्वजण पालखी मार्गाची पाहणी करतात. अनेकदा या मार्गावरून ते सायंकाळच्या वेळीही ये- जा करतात मग उड्डाणपुलांवरील महिनोनमहिने बंद असलेले पथदिवे या सर्वांच्या नजरेतून सुटतात तरी कसे? की हा अंधार दिसूनही दुर्लक्षित केला जात आहे? पालखीपूर्वी तरी या प्रश्नाचे उत्तर कृतीतून मिळेल, अशी अपेक्षा वारकरी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.






