आपलं फलटण(प्रतिनिधी)फलटण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत काळज येथे आंबा जाम निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर करून महिला व ग्रामस्थांना फळ प्रक्रिया व मूल्यवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकादरम्यान कृषीदूतांनी पिकलेल्या आंब्यापासून जाम तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. आंबे सोलून त्याची प्युरी तयार करणे, त्यामध्ये साखर व लिंबाचा रस मिसळून मिश्रण योग्य घट्ट होईपर्यंत शिजवणे आणि तयार जाम निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून सुरक्षितरीत्या साठवण करण्याची पद्धत त्यांनी समजावून सांगितली. या प्रक्रियेद्वारे घरगुती स्तरावर दर्जेदार जाम तयार करून फळांना मूल्यवर्धन करता येते, तसेच पूरक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे तसेच प्रा. नीतिशा पंडित, प्रा. जी. बी. आडसुळ आणि कृषी अभियांत्रिकी विषय मार्गदर्शक प्रा. रश्मी नाईकवडी यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषीदूत अभिजीत पिसाळ, रोहन माळी, यश पाटील, राहुल पावरा, सुरज शिंदे, अभिषेक राक्षे आणि साहिल शिंदे यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. ग्रामीण महिलांनी या प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले.






