आपलं फलटण (प्रतिनिधी )
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2026-27 अंतर्गत विठ्ठलवाडी येथे ग्रामस्थ व गावच्या नेतृत्वांसोबत विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या उपक्रमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीतील नवकल्पना आणि ग्रामविकासाच्या विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.
कृषीदूतांनी गावकऱ्यांना कृषी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत सेंद्रिय शेतीतील गांडूळ खत, जीवामृत व जैविक खतांचा वापर, पीक संरक्षणासाठी जैविक कीटकनाशकांचे महत्त्व, मशरूम उत्पादन, बेकरी उत्पादने तसेच फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगांविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय जमिनीचा कस वाढविण्यासाठी प्रॉम (PROM) खतांच्या वापराचे महत्त्वही विशद करण्यात आले.
महाविद्यालयातील संशोधन व प्रगत शेती तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतीतील समस्यांवर उपाय शोधण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. गणेश अडसूळ तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे आणि तुषार ठेंगल यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
ग्रामीण भागात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.





