आपलं फलटण प्रतिनिधी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदूतांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली. या उपक्रमाला ग्रामस्थ व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी कृषीदूतांनी पेरणीपूर्वी बियाण्यांवर करण्यात येणाऱ्या बीज प्रक्रियेचे महत्त्व सविस्तरपणे उलगडून सांगितले. रोग, किडी व बुरशीजन्य प्रादुर्भावापासून बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट रासायनिक तसेच जैविक घटकांचा वापर करून बीज प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवणक्षमता व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, उत्पादनात भरघोस वाढ होते तसेच पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकाद्वारे जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया साहित्याचा योग्य प्रमाणात आणि शास्त्रोक्त पद्धतीने वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करताना बीज प्रक्रिया ही शेतीतील उत्पादनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. नीतीषा पंडित तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागाचे विशेष मार्गदर्शक प्रा. पी. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषीदूत अभिजीत पिसाळ, रोहन माळी, यश पाटील, राहुल पावरा, सुरज शिंदे, साहिल शिंदे व अभिषेक राक्षे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.’निरोगी बियाणे, भरघोस उत्पादन’हा संदेश देत कृषीदूतांनी शेतकऱ्यांमध्ये बीज प्रक्रियेबाबत जनजागृती घडवून आणली.






