फलटण( आपलं फलटण )फलटण शहरासह तालुक्याच्या विविध भागांत गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला.
जिंती-साखरवाडी मार्गावर मोठे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र जिंतीचे उपसरपंच शरदराव रणवरे यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर झाड बाजूला करण्यात आले व वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
फलटण शहरासह तिरकवाडी, विडणी, वनदेवशेरी (कोळकी), दुधेबावी, वडले, नाईकबोमवाडी, बरड, राजुरी, मिरढे, गिरवी, निरगुडी, साखरवाडी, जिंती, सासवड आणि तरडगाव परिसरात पावसाची नोंद झाली. तर आसू, मुंजवडी व गोखळी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या तयारीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पूर्व भागातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
छायाचित्र : साखरवाडी-जिंती मार्गावर कोसळलेल्या वृक्षामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.







