फलटण (आपलं फलटण)
फलटणमधील एका महाविद्यालयात सबमिशन करून दुचाकीवरून घरी परतणारे भाऊ-बहीण घरी पोहोचलेच नाहीत. अखेर घटनेच्या तिसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह नीरा उजव्या कालव्यात गुरसाळे गावाच्या हद्दीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे की अपघात, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल काकासो चोपडे (वय २३) व किरण काकासो चोपडे (वय २६, रा. मेखळी, ता. बारामती) अशी मृतांची नावे आहेत. काजल ही फलटण येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. मंगळवारी (दि. ७) कॉलेजमध्ये सबमिशन करण्यासाठी ती भाऊ किरणसोबत दुचाकीवरून फलटणला आली होती. सबमिशन पूर्ण करून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत दोघेही घरी जाण्यासाठी निघाले.
मात्र, रात्र झाली तरी दोघेही घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. वडिलांनी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांचेही मोबाईल बंद येत होते. तातडीने कॉलेजमध्ये चौकशी केली असता, ते सबमिशन करून निघून गेल्याचे समजले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असतानाच गुरुवारी तिसऱ्या दिवशी गुरसाळे गावाच्या हद्दीत किरण चोपडे याचा तर धर्मपुरी गावच्या हद्दीत काजल चोपडे हिचा नीरा उजव्या कालव्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच दोघांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणात घातपात झाला आहे की अपघात, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसून तपास विविध अंगांनी सुरू आहे. ज्या दुचाकीवरून दोघे गेले होते ती अद्याप सापडलेली नाही, त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे.
चौकट — ‘न परतणाऱ्या वाटेवर गेलेले दोन जीव…’
घरातून हसत-खेळत निघालेले भाऊ-बहीण परत येणारच नाहीत, ही कल्पनाही कुटुंबीयांच्या मनाला चिरणारी ठरली आहे. काजलच्या स्वप्नांना पंख फुटण्याआधीच काळाने झडप घातली, तर बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला भाऊ किरणही तिच्यासोबतच निघून गेला.
आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर अजूनही त्यांची वाट पाहणारा दरवाजा उघडाच आहे…
फोन वाजेल, दार ठोठावले जाईल आणि दोघेही परत येतील, या आशेचा किरण आता कायमचा मावळला आहे.
या हृदयद्रावक घटनेने चोपडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मेखळी (ता. बारामती) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन निष्पाप जीवांच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.






