सातारा (आपलं फलटण) सातारा जि. प
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जि.प.सदस्यांवर करण्यात आला असून, यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ऋतुजा जगताप, लता कर्णे आणि कामेश कांबळे या तीन जि.प. सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुले यांच्या वतीने अॅड. दत्ता घोडके यांनी ही याचिका सादर केली आहे.
जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान पक्षाने दिलेल्या अधिकृत ‘व्हीप’चे पालन न करता, पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केल्याचा ठपका संबंधित सदस्यांवर ठेवण्यात आला आहे. या कृत्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरच संबंधित सदस्यांना नोटीस बजावली जाणार असून, दोन्ही बाजूंची मते ऐकून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार अशा प्रकरणांचा निकाल निश्चित कालमर्यादेत देणे आवश्यक असून, साधारणतः सहा महिन्यांच्या आत निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मांडल्या जाणाऱ्या मुद्द्यांकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील घडामोडी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात.






