खंडाळा (आपलं फलटण प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे मोर्वे (सोलाडी शिवार) येथे सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसात दुर्दैवी घटना घडली. अचानक वीज कोसळल्याने शेतकरी अमोल गोपाळ धायगुडे यांच्या तब्बल ८ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १ मेंढी गंभीर जखमी झाली आहे. मेंढपाळ धायगुडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने धायगुडे कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. विजेचा कडकडाट सुरू असतानाच शिवारात चरणाऱ्या जनावरांवर वीज पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान अचानक येत असलेल्या अवकाळी पावसाच्या कालखंडात शेतकरी व पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






