फलटण : आपलं फलटण
सातारा जिल्ह्यातील सन २०२६-२०२७ च्या गाळप हंगामासाठी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील ‘दि. दत्त इंडिया प्रा. लि.’ सह जिल्ह्यातील सात प्रमुख साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात सुरू असलेले ऊस दर आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, किसान काँग्रेस यांसह विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे ही माहिती कळवण्यात आली आहे. आगामी हंगामात उत्पादित होणाऱ्या साखरेला मिळणारा एकूण सरासरी भाव विचारात घेऊन ऊसाच्या पुढील पेमेंटचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका संबंधित कारखान्यांनी प्रशासनाकडे सादर केली आहे.

पहिली उचल ३,८०० रुपये जाहीर केलेले कारखाने:
- दत्त इंडिया प्रा. लि. (साखरवाडी, ता. फलटण)
- जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. (चिमणगाव, ता. कोरेगाव)
- अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या. (शाहूनगर-शेंद्रे, ता. सातारा)
- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. (रेठरे बु., ता. कराड)
- जयवंत शुगर्स लि. (धावरवाडी, ता. कराड)
- सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. (यशवंतनगर, ता. कराड)
- शिवनेरी शुगर्स लि. (जयपूर, ता. कोरेगाव)
दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्यांच्याही जिल्हा प्रशासन संपर्कात असून, त्यांच्यामार्फतही लवकरात लवकर ऊस दर जाहीर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पहिली उचल नको, ‘कोल्हापूर पॅटर्न’प्रमाणे अंतिम दर जाहीर करा!
प्रशासनाने ३,८०० रुपये पहिल्या उचलीचा प्रस्ताव मांडला असला, तरी शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आणि आक्रमक आहेत. कारखान्यांनी केवळ पहिली उचल जाहीर न करता थेट अंतिम ऊस दर जाहीर करावा, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात ज्याप्रमाणे कारखान्यांनी एकरकमी आणि समाधानकारक दर जाहीर केले आहेत, त्याच ‘कोल्हापूर पॅटर्न’च्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे.






