फलटण : आपलं फलटण
धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि नागरिकांच्या विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित होत असलेल्या माळजाई मंदिर व उद्यान परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर सायंकाळी आठ ते दहाच्या सुमारास काही मद्यपींचा वावर असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांसोबत फिरण्यासाठी येणाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत आहे. या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी नियंत्रण मिळविण्याची आवश्यकता आहे.लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीने गेल्या दोन वर्षांत मंदिर-उद्यान परिसरात सुशोभीकरणासह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांची या परिसरात ये-जा वाढली आहे.
नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि महिलांसाठीच्या विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा परिसरात नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळणे ही केवळ अपेक्षा नसून संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे.मात्र, मंदिराच्या मागील रस्त्यावरील मद्यपींच्या कथित वावरामुळे या परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना आणि कुटुंबांना रस्त्यावरून जाताना असुरक्षित वाटत असेल, तर परिसराच्या विकासाबरोबरच सुरक्षेच्या उपाययोजनांचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे, गैरवर्तन करणे किंवा शांततेचा भंग करणे यांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केवळ तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यापुरती भूमिका न ठेवता, संबंधित परिसरात ठरावीक वेळेत नियमित गस्त घालणे, नागरिकांशी संवाद साधणे आणि त्रासदायक वर्तन आढळल्यास कायद्यानुसार तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. विशेषतः रात्री आठ ते दहाच्या वेळेत पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढल्यास अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते. गरज भासल्यास मंदिर व उद्यान समिती आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधूनही उपाययोजना करता येतील.
माळजाई मंदिर व उद्यान परिसर विकसित करण्यामागे नागरिकांना शांत, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्या प्रयत्नांवर असुरक्षिततेच्या सावटाने पाणी फिरू नये. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष उपाययोजनांतून आपली जबाबदारी सिद्ध करावी. पोलिसांनी या प्रकाराची वस्तुस्थिती तपासून प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि महिला भाविकांसह सर्व नागरिकांना निर्भयपणे मंदिर व उद्यान परिसरात येता-जाता येईल, असे वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






