फलटण: आपलं फलटण फलटणचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्याबरोबरच स्थानिक कलागुणांना व्यासपीठ, लघुउद्योजकांना प्रोत्साहन आणि नागरिकांना दर्जेदार मनोरंजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ मध्ये होम मिनिस्टर पैठणी शोला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रंगलेल्या या कार्यक्रमात पूजा म्हेत्रे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी पटकावली, तर संध्या गायकवाड यांना द्वितीय क्रमांकाच्या पैठणीने सन्मानित करण्यात आले. पहिल्या दहा स्पर्धकांना साडी भेट देऊन गौरविण्यात आले.
फलटणच्या सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून महिला भगिनींना सहभागी होण्याची संधी मिळावी, तसेच स्थानिक व्यावसायिक व लघुउद्योजकांना आपली उत्पादने आणि कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या व्यापक भूमिकेतून फलटण फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला.
प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि ए. बी. ज्वेलर्सच्या संचालिका सारिका शहाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या अध्यक्षा अॅड. मधुबाला भोसले, फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, स्वयंसिद्धाच्या संचालिका मृणालिनी भोसले, राजस भोईटे, ऐश्वर्या नाईक निंबाळकर, मयुरा गांधी, नगरसेविका रुपाली सस्ते व सुपर्णा आहिवळे, अनुराधा गोडसे, स्वाती फुले आदी मान्यवर उपस्थित होत्या.
लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते व निवेदक रमेश परळीकर यांनी आपल्या खुमासदार, विनोदी आणि उत्स्फूर्त शैलीतील निवेदनाने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. ‘तळ्यात-मळ्यात’, ‘फास्ट फिंगर’, झटपट उत्तरे आणि मजेशीर उखाणे अशा विविध खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. पैठणी जिंकण्यासाठी रंगलेल्या चुरशीच्या स्पर्धेमुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सांस्कृतिक परंपरा, मनोरंजन, महिला सहभाग आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून होत असून, अशा उपक्रमांतून शहराच्या सांस्कृतिक जीवनाला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






