फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी ) अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील आरक्षणाच्या अ, ब, क, ड अशा उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फलटणमध्ये आज, गुरुवार दि. १० सप्टेंबर रोजी विराट ‘संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चा’ काढण्यात येणार आहे. एस.सी. प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास ५९ जातींच्या आरक्षणावर त्याचा परिणाम होऊन सामाजिक, शैक्षणिक व रोजगाराच्या संधींवर विपरीत परिणाम होण्याची भीती मोर्चाच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या मोर्चात एस.सी. प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी महिला-पुरुषांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे गुणवंत विद्यार्थी तसेच रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांच्या भवितव्याचा विचार करून उपवर्गीकरणाला विरोध करण्याची भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
एस.सी. प्रवर्गातील आरक्षणात विभागणी झाल्यास उपलब्ध आरक्षणाचे तुकडे होऊन त्याचा लाभ विविध घटकांना मिळण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ सध्याच्या पिढीचा नव्हे, तर पुढील पिढीच्या शैक्षणिक व रोजगाराच्या संधींचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरम्यान, फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ येथे एस.सी. प्रवर्गातील विविध समाजघटकांच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी बौद्ध, चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार, वाल्मिकी-मेहतर-रुखी आदी समाजघटकांच्या प्रतिनिधींनी उपवर्गीकरण विरोधी मोर्चात आपला समाज ताकदीने सहभागी होणार असल्याचे एकमताने जाहीर केले.

असा असेल मोर्चाचा मार्ग
गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मंगळवार पेठ येथील समाज मंदिरापासून मोर्चाला सुरुवात होणार असून, बारामती चौक मार्गे प्रांत कार्यालय, फलटण येथे मोर्चा पोहोचणार आहे. यानंतर फलटण प्रांताधिकाऱ्यांना उपवर्गीकरणाला विरोध करणारे निवेदन देण्यात येणार आहे.
आयोजक : संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण.






