फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी:
शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील सिम्बायोसिस ईशान्य ऑडिटोरियम, विमाननगर येथे झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी ग्लोबल इलाइट मीडिया टेकचे पदाधिकारी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रबोधिनी (यशदा)चे संचालक श्री. राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह देशभरातील पुरस्कारार्थी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार व आप्तेष्ट उपस्थित होते.
सौ. सोनवलकर यांनी एस. पी. कॉलेज, पुणे येथून बी.एस्सी., शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, माळेगाव येथून बी.एड. तसेच पुणे विद्यापीठातून एम.ए., डी.एस.एम. शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, वडवाडी येथे प्राचार्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, सध्या त्या महात्मा फुले विद्यानिकेतन शिक्षण संस्थेच्या गगनगिरी इंग्लिश मीडियम स्कूल, संतोषनगर, कात्रज येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

आधुनिक शिक्षणपद्धतीवर भर
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. स्मार्ट क्लास, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, संगणक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व अनुभवाधारित शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांनाही त्यांनी शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले. कृतीतून मूल्यशिक्षण, पर्यावरण संवर्धनाची जनजागृती आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरणाची निर्मिती यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
कुटुंबाच्या पाठबळामुळे यशाची वाटचाल
सौ. सोनवलकर यांच्या शैक्षणिक कार्याला त्यांचे पती श्री. संपत बाबुराव सोनवलकर यांची खंबीर साथ लाभली. श्री. सोनवलकर यांनी सावित्रीबाई फुले अध्यापिका विद्यालय, नायगाव, ता. खंडाळा येथे अधिव्याख्याता म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या कन्या डॉ. प्राची सोनवलकर या बी.ए.एम.एस. असून चिरंजीव श्री. रोहन सोनवलकर हे अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
फलटणमधून अभिनंदनाचा वर्षाव
राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. रतन माळी, अध्यक्ष सौ. स्मिताताई वाघ व सचिव श्री. रवींद्र वाघ यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी, गगनगिरी इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सौ. सोनवलकर यांचे अभिनंदन केले.
वडले ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ, समस्त सोनवलकर पाटील परिवार, श्री. संपत सोनवलकर यांचा मित्रपरिवार, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शंकरराव सोनवलकर व सोनवलकर हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ज्ञान, संस्कार आणि आधुनिकतेची दिशा देत शिक्षक म्हणून आपली सामाजिक जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या सौ. संजीवनी सोनवलकर यांचा राष्ट्रीय सन्मान हा फलटणच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाचा क्षण ठरला आहे.





