फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42 रा. लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विठ्ठल साठे (वय अंदाजे ५२) व मोहन गायकवाड (वय अंदाजे ६०), दोघेही रा. इंदापूर तालुका, हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात तुटून पडलेली दुचाकी
घटनास्थळ व फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आय-ट्वेंटी कार (एमएच १२ झेडसी ९८३४) फलटणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी शिंगणापूरच्या दिशेने आलेली डिस्कव्हर दुचाकी (एमएच ४२ एपी ९५७७) राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे रस्ता ओलांडत असताना कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील मंगल साठे या रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात जागीच मयत झालेल्या मंगल साठे
अपघातातील मृत मंगल साठे यांच्यासह विठ्ठल साठे व मोहन गायकवाड हे तिघेही लासुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल साठे व मोहन गायकवाड यांना राजुरीचे पोलिस पाटील लक्ष्मण बागाव तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून पुढील उपचारासाठी फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमींच्या उपचाराची व्यवस्था केली तसेच अपघाताची नोंद व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.

संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले
दुभाजकाच्या उपाययोजनेचे आश्वासन दरम्यान, या अपघातानंतर राजुरी परिसरातील ग्रामस्थ व मृत महिलेच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांशी चर्चा केली. राजुरी चौफुला येथील दुभाजकाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेडिंग व अपघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांचे मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे लासुर्णे तसेच राजुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





