लेखनकलेची खरी आदरांजली; स्व. प्रा. रमेश आढाव स्मरणार्थ ‘एक लाख वह्या’ वाटपाचा प्रेरणादायी संकल्प
फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी):
समाजहित, सामाजिक न्याय आणि लोकप्रबोधनासाठी आयुष्यभर लेखणी झिजविणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या स्मरणार्थ राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे मोफत वाटप करण्याचा आढाव कुटुंबीयांचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी असून, ही त्यांच्या लोकाभिमुख पत्रकारितेला वाहिलेली खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन कै. भाऊसाहेब दैठणकर प्रा. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुपुत्र बंडी यांनी केले.

(छायाचित्र: स्व. प्रा. रमेश आढाव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना आढाव कुटुंबीय, शिक्षक, पालक व उपस्थित मान्यवर)
महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. प्रा. रमेश आढाव यांच्या जयंतीनिमित्त निंभोरे (ता. फलटण) येथील प्रा. आश्रमशाळेत अभिवादन व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे अधीक्षक अनिल महामुनी, मोहनराव माळवे, दस्तगीर पठाण, संजय इंगळे, चंदाराणी जगताप, शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी, पालक तसेच आढाव कुटुंबीय, आप्तेष्ट उपस्थित होते.
सुपुत्र बंडी म्हणाले स्व. प्रा. रमेश आढाव यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता लोकसेवेचे प्रभावी माध्यम बनविले. समाजातील वंचित, उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांनी मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे .
अधीक्षक अनिल महामुनी म्हणाले , शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याची स्व. प्रा. आढाव यांची तळमळ कायम स्मरणात राहील. त्यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प हा समाजासाठी प्रेरणादायी असून, शिक्षणाला बळ देणारा उपक्रम ठरणार आहे.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्व. प्रा. रमेश आढाव यांच्या कार्यावर भाषणे करून अभिवादन केले. ऋषिकेश आढाव व आढाव कुटुंबीयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, लेखनसाहित्य व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
प्रारंभी स्व. प्रा. रमेश आढाव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मोहनराव माळवे यांनी केले, तर समारोप व आभार अनिल महामुनी यांनी मानले.
.





