फलटण :आपलं फलटण प्रतिनिधी ::
फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधातील मोहिमेला वेग देत सस्तेवाडी (ता. फलटण) येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान फलटण ग्रामीण पोलिसांना सस्तेवाडी येथे गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
कारवाईदरम्यान २८० लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी दोन लोखंडी कढई, जर्मनचे काळे-पांढरे ड्रम, बाभळीच्या झाडाच्या साली, गुळाचे ढेप, तुरटी तसेच इतर साहित्य असा एकूण २ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, फलटण) याला अटक करण्यात आली आहे. तसेच कृष्णा ऊर्फ पप्प्या विश्वास पवार, गणेश मोहिते आणि रुपेश चव्हाण (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे तसेच पोलीस कर्मचारी खरात, चतुरे, दडस, कदम यांनी संयुक्तपणे पार पाडली.
फलटण ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





