फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी
गोपनीय माहितीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलिसांनी बरड जवळील रांजणी पुनर्वसन (ता. फलटण) येथील बंद मराठी शाळेच्या मैदानात उभ्या असलेल्या ट्रकवर धाड टाकून बेकायदा स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत ₹24 लाख 72 हजार 1 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, ट्रकसह स्फोटकांचा साठा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध स्फोटके अधिनियम व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.
याप्रकरणी हेमराज महावीर जाट (मूळ राहणार भीलवाडा राजस्थान सध्या राहणार बरड तालुका फलटण )यास अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रांजणी पुनर्वसन परिसरातील बंद मराठी शाळेच्या मैदानात दोन दिवसांपासून स्फोटकांनी भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, कर्मचारी व पंचांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली.तेथे एमएच 11 सीएच 2555 क्रमांकाचा टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चौकशीदरम्यान ट्रकमध्ये स्फोटकांच्या कांड्यांचे बॉक्स असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत Ecoprime X 83 मिमीचे 500 बॉक्स आणि Superpower 90X चे 4 बॉक्स असा मोठा स्फोटकांचा साठा आढळून आला.
तपासादरम्यान Ecoprime या स्फोटकांपैकी काही माल वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र Superpower 90X स्फोटकांबाबत आवश्यक परवाने व कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. तसेच लोकवस्तीच्या परिसरात निष्काळजीपणे स्फोटकांनी भरलेला ट्रक उभा करून मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण केल्याचा ठपकाही पोलिसांनी ठेवला आहे.
या कारवाईत स्फोटकांचा संपूर्ण साठा, ट्रक तसेच रासायनिक विश्लेषणासाठी आवश्यक नमुने जप्त करण्यात आले. जप्त केलेला स्फोटकांचा साठा सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) व हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाडा, राजस्थान; सध्या रा. बरड, ता. फलटण) यांच्याविरुद्ध स्फोटके अधिनियम 1884, स्फोटके अधिनियम 1908 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार अमोल किसन चांगण यांनी फिर्याद दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे व पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.





