फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात आता आणखी एका संवेदनशील घटनेने खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांच्या हातावर लिहिलेल्या कथित मजकुराचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ही घटना घडली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी , डॉ. राजेंद्र रूपनवर तसेच काही व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख (रा. जावली, जि. सातारा) आणि त्याच्यासोबत आलेल्या काळ्या सफारी पोशाखातील एका अनोळखी व्यक्तीने डॉ. रूपनवर यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, वाद वाढल्यानंतर सफारी पोशाखातील व्यक्तीने डॉ. रूपनवर यांच्या अंगावर धाव घेत त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली तसेच “मार दूंगा” अशी धमकी दिली. त्यानंतर प्रसाद कोंडेदेशमुख यांनी “हे तुला खूप महागात पडेल, उद्या सकाळी समजेल मी कोण आहे,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे डॉक्टर करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गाजरे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर डॉ. रूपनवर यांच्या हातावर लिहिलेल्या कथित मजकुराचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर त्यांनी काही माध्यमांशी बोलताना, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कथित स्वीय सहाय्यकाकडून दबाव आणला जात असून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यामुळे मानसिक तणाव निर्माण झाला, असा दावा केला आहे.
मात्र, या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्तींची बाजूही अधिकृतरीत्या समोर आलेली नसून, त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान डॉक्टर रुपनवर यांनी केलेल्या तक्रारीनंतर ज्या ठिकाणी सरकारी कामात अडथळा आणला त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून तेथील कर्मचारी साक्षीदार संबंधितांचे आवश्यक ते जाब जबाब घेतले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारदार डॉक्टरांचे समुपदेशनही केले. याच दरम्यान आरोग्य विभागाचे त्रि सदस्यीय पथक साताराहून फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल झाले. सदर पथकाने रुग्णालयातील अधीक्षक तथा संबंधित अन्य कर्मचाऱ्यांच्याकडून घटने संदर्भात माहिती घेतली. मात्र यावेळी तक्रारदार डॉक्टरांची चौकशी प्रक्रिया झाली नसल्याचे रुग्णालय मुख्य सूत्राकडून समजले.
यापूर्वी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय राज्यभर चर्चेत आले होते. त्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच आता वैद्यकीय अधिकाऱ्याशी संबंधित धमकी व कथित मानसिक छळाच्या आरोपांमुळे रुग्णालयातील प्रशासकीय वातावरण, कर्मचारी सुरक्षा आणि कामकाजाच्या पद्धतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांत नेमका कोणता गुन्हा?
पोलीस ठाणे : फलटण शहर पोलीस ठाणे
गुन्हा क्रमांक : २८०/२०२६
कलमे : भारतीय न्याय संहिता कलम १३२, ३५१(२), ३५१(३), ३(५)
घटना : सरकारी कामात अडथळा, दमदाटी, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी
फिर्यादी : डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर
मुख्य आरोपी : प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख व त्याच्यासोबतचा अज्ञात व्यक्ती
प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हातावरील कथित मजकुराचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल.
डॉक्टरांनी मानसिक त्रास, दबाव व धमकीचे आरोप माध्यमांसमोर मांडले.
धमकी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने स्वतंत्र चौकशी सुरू केली.
आरोपांबाबत अद्याप अधिकृत पडताळणी झालेली नाही.





