फलटण | आपलं फलटण प्रतिनिधी
फलटण शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरील आठवडा बाजार परिसरात पालिकेने नुकताच उभारलेला पथदिव्याचा खांब रविवारी अचानक कोसळल्याने दोन शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली. भर गर्दीच्या आठवडा बाजारात हा प्रकार घडल्याने काही काळ एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे नव्याने उभारण्यात आलेल्या पथदिवा प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेत अनिल लालासाहेब भोसले (रा. टाकळवाडे, ता. फलटण) यांच्या मांडीवर पथदिव्याचा खांब पडल्याने त्यांना गंभीर मार लागून मांडीला मोठी सूज आली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. तर वैशाली राजेंद्र राऊत (रा. विडणी, ता. फलटण) यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर फलटणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी भरलेल्या आठवडा बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या पालाची दोरी जवळील पथदिव्याच्या खांबाला बांधली होती. त्याचवेळी बाजारातून जात असलेल्या एका चारचाकी वाहनात ती दोरी अडकल्याने संपूर्ण खांब कोसळला. खांबाचा जोरदार फटका बसल्याने अनिल लालासाहेब भोसले व वैशाली राऊत जखमी झाले. अपघातानंतर परिसरात घबराट पसरली होती.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विकास काकडे, संदीप चोरमले आणि विशाल तेली यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. तसेच कोसळलेला पथदिव्याचा खांब सुरक्षित ठिकाणी हलवून परिसरातील धोकादायक साहित्य हटविण्यात आले. भविष्यात आणखी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर संबंधित नगरसेवकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आणि आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पालखी सोहळ्यापूर्वी शहरात उभारण्यात आलेल्या नव्या पथदिव्यांचे खांब वारंवार कोसळत असल्याने संबंधित कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही दिवसांपूर्वी एसटी बसस्थानकासमोर एसटी बसचा धक्का लागून एक पथदिव्याचा खांब कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने जीवितहानी टळली होती. त्यानंतर विद्युत बॉक्सला धक्का लागल्याने एका गाढवाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली. आता भर आठवडा बाजारात पुन्हा खांब कोसळून दोन नागरिक जखमी झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील आकर्षक पथदिवा उभारणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का? कामात निष्काळजीपणा झाला का? ज्या ठिकाणी पथदिव्यांचे खांब उभारले आहेत तेथे आवश्यक सुरक्षा उपाययोजना व संरक्षक डिव्हायडर का उभारले गेले नाहीत? ठेकेदाराकडून कामात दिरंगाई झाली का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व पथदिव्यांच्या खांबांची तातडीने तांत्रिक तपासणी करून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
फोटो
1 भर आठवडा बाजारात पथदिव्याचा खांब कोसळल्यानंतर जखमी झालेल्या लालासाहेब भोसले (रा. टाकळवाडी) यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविताना नागरिकांची धावपळ.
2 घटनास्थळी तातडीने दाखल होऊन कोसळलेला खांब सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व परिसरातील धोकादायक साहित्य हटविण्याची पाहणी करताना नगरसेवक विकास काकडे, संदीप चोरमले व विशाल तेली.





