आपल फलटण प्रतिनिधी
शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ४२ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्थ मनिष गाधी( 25)ज्वेलरी व्यावसायिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व याबाबत पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील एका २५ वर्षीय व्यावसायिकाला आरोपींनी फोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून शेअर मार्केट ट्रेडिंगचा अनुभव असल्याचे सांगितले. तसेच एआयएफ व शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपींनी फिर्यादीला विविध ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने वेगवेगळ्या बँक व्यवहारांद्वारे आणि यूपीआयच्या माध्यमातून एकूण ४२ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये जमा केले. ट्रेडिंग खात्यात नफा झाल्याचे भासवून आरोपींनी आणखी रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर विविध कारणे सांगून पैसे परत न करता, मार्जिन भरणे व ट्रेडिंग पोझिशन्स रिलीज करण्याच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी करण्यात आली.
फिर्यादीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती, यूपीआय व्यवहार तसेच फसवणुकीची रक्कम ज्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली त्यांचा तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
शेअर मार्केट ट्रेडिंग, ऑनलाइन गुंतवणूक किंवा मोठ्या नफ्याचे आमिष दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कोणालाही ओटीपी, पिन, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन फलटण शहर पोलिसांनी केले आहे.





