फलटण | आपलं फलटण प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील वडले या छोट्याशा गावातील प्रतिभावान हॉकीपटू आदित्य अर्जुन लाळगे याची आगामी FIH पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघात निवड झाल्याने संपूर्ण फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने अथक परिश्रम, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवत जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात नवे सुवर्णपान लिहिले आहे.
बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे १४ ते ३० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठेच्या विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या २० सदस्यीय भारतीय संघात आदित्यची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व स्टार डिफेंडर हरमनप्रीत सिंग यांच्याकडे सोपविण्यात आले असून, संघातील युवा फॉरवर्ड म्हणून आदित्यकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

आदित्यने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. २०२२ च्या ज्युनिअर आशिया करंडक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व करत विजेतेपद पटकावणाऱ्या संघात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मलेशिया येथे झालेल्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली. याच उत्कृष्ट खेळाच्या जोरावर त्याला हॉकी इंडिया लीगमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आपल्या वेगवान ड्रिबलिंग, आक्रमक खेळशैली आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो देशातील आश्वासक युवा फॉरवर्ड म्हणून ओळखला जात आहे.
आदित्य इंडियन नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचे वडील अर्जुन लाळगे शेती करतात, तर आई संगिता लाळगेही शेतीची जबाबदारी सांभाळतात. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या आदित्यने कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर देशासाठी खेळण्याचे स्वप्न साकार केले आहे.
विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळवणारा आदित्य हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर हॉकी खेळण्याची प्रेरणा मिळाल्याचे तो सांगतो. फलटण तालुक्यातील कोळकी येथील ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिचीही आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात दुहेरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्यच्या यशामागे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडले येथील शिक्षकांचा मोठा वाटा आहे. इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असताना पांडुरंग निकाळजे, विकास भुजबळ, रवींद्र ननावरे आणि भोलचंद बरकडे या शिक्षकांनी त्याला हॉकीचे प्राथमिक धडे दिले. त्यानंतर त्याने पुणे येथील बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेत आपल्या खेळाला अधिक धार दिली.
क्रीडा मार्गदर्शक पांडुरंग निकाळजे म्हणाले, “आदित्य लहानपणापासूनच कष्टाळू, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक विद्यार्थी होता. ग्रामीण भागातील मुलगा जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरापर्यंत पोहोचू शकतो, याचे आदित्य हे प्रेरणादायी उदाहरण आहे.”
आदित्यच्या या ऐतिहासिक निवडीमुळे वडले गावासह संपूर्ण फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता विश्वचषक स्पर्धेतही तो भारतासाठी चमकदार कामगिरी करत तिरंगा अधिक उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.





