आपलं फलटण: आंदरूड प्रतिनिधी
लोकनेते स्व. विनायकराव श्यामराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चिरंजीव तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराज विनायक पाटील यांच्या पुढाकारातून सोमवार, दि. 20 जुलै 2026 रोजी आंदरुड येथे भव्य रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवेची परंपरा जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा कार्यक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हनुमान मंदिर सभामंडप, आंदरुड (ता. फलटण, जि. सातारा) येथे होणार असून, मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर (बाबा), माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या समाजोपयोगी उपक्रमात युवक, महिला, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाद्वारे गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन लोकनेते स्व. विनायकराव श्यामराव पाटील प्रतिष्ठान, आंदरुड यांच्या वतीने करण्यात आले आहे.





