आपलं फलटण प्रतिनिधी :
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी फलटण एसटी आगार व बसस्थानकाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे नेते संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत बसस्थानकाचे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर अत्याधुनिक पद्धतीने आधुनिकीकरण करण्यात येईल, तसेच फलटण आगारासाठी टप्प्याटप्प्याने २५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
पंढरपूर दौऱ्यावर असताना फलटण बसस्थानकाला भेट देण्याची विनंती संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान केली होती. त्याचवेळी त्यांनी फलटण बसस्थानकातील विविध समस्या परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या अनुषंगानेच आपण फलटणला भेट दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता बसेसची कमतरता दूर करण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पहिल्या टप्प्यात १५ नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी १० बसेस देण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बसस्थानकाचा विकास पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार असून आधुनिक प्रतीक्षालय, व्यापारी गाळे, पार्किंग, स्वच्छतागृहे, डिजिटल माहिती व्यवस्था तसेच अन्य प्रवासी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बसस्थानकाच्या पाहणीदरम्यान मंत्र्यांनी स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. बसस्थानकातील शौचालये वर्षभर अशीच स्वच्छ राहतील, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच बसस्थानक परिसरात पडून असलेली स्क्रॅपमधील वाहने आरटीओच्या समन्वयातून तातडीने हटविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, दत्ता बापू अनपट, दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






