फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा )
फलटण नगरपरिषदेत मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कथित कर घोटाळ्याचा मोठा भांडाफोड झाला असून, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या अंतर्गत चौकशीत धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी स्वतः चौकशीची सूत्रे हाती घेतली. प्राथमिक तपासात कर वसुली विभागातील काही कर्मचाऱ्यांनी संगनमताने मालमत्ता कर, घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीत मोठा गैरव्यवहार केल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोठी थकबाकी असलेल्या नागरिकांना “तुमची थकबाकी कमी करून देतो” असे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख स्वरूपात रक्कम स्वीकारली जात होती. मात्र, ही रक्कम नगरपरिषदेच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप आहे. संबंधित नागरिकांना मात्र थकबाकी भरल्याच्या अधिकृत पावत्या देण्यात येत असल्याने हा प्रकार अनेक वर्षे उघडकीस आला नसल्याची चर्चा आहे.
या गैरव्यवहारासाठी नगरपरिषदेच्या ‘महानेट’ करप्रणाली सॉफ्टवेअरचा कथित गैरवापर करण्यात आल्याचाही संशय व्यक्त होत आहे. सॉफ्टवेअरमध्ये लॉगिन करून पावत्या डिलीट करणे, नोंदींमध्ये फेरफार करणे, थकबाकी जमा झाल्याचे दाखविणे आणि त्यानंतर संबंधित नागरिकांना अधिकृत पावत्या देणे, अशा पद्धतीने हा प्रकार सुरू असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत समोर आली आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीसमोर काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या लेखी जबाबांमध्ये धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्याचे समजते. एका कर्मचाऱ्याने मालमत्ता हस्तांतरण, नवीन नोंदणी, भाडेकरूंची नोंद कमी करणे तसेच मूल्यांकनाच्या कामांसाठी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचे मान्य केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या जबाबात महानेट सॉफ्टवेअरमधून पावत्या डिलीट करून रोख रकमेचा अपहार करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. या कथित गैरप्रकारात काही महिला कर्मचाऱ्यांवरही दबाव आणल्याचे उघड झाले आहे. नागरी सुविधा केंद्रातील एका महिला लिपिकाकडे महानेट सॉफ्टवेअरचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मागण्यात आला होता. त्यांनी तो देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही पुढे आला आहे. या घटनेचीही चौकशी सुरू आहे.
समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी या संपूर्ण प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून, “फलटणकरांच्या घामाच्या पैशावर कुणाचाही डल्ला खपवून घेतला जाणार नाही. चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येक कर्मचारी व संबंधितांवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला असून, चौकशी समितीमार्फत सर्व पुरावे तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या कर घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती आहे? तो किती वर्षांपासून सुरू होता?यामध्ये केवळ कर्मचारीच की अन्य अधिकारी अथवा बाहेरील व्यक्तींचाही सहभाग होता का? याचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कर घोटाळ्यापुरतीच चौकशी मर्यादित राहणार नसून पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन, ‘स्वच्छ फलटण-सुंदर फलटण’ अभियानांतर्गत झालेली कामे, विविध निविदा प्रक्रिया तसेच विकासकामांतील आर्थिक व्यवहारांचीही छाननी होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेतील अनेक वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा तपासण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
फलटण नगरपरिषदेतील हा कथित कर घोटाळा केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित नसून संपूर्ण प्रशासन व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी किती कारनामे समोर येतात आणि जबाबदारांवर कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.






