आपलं फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या कुटुंबीयांनाच मृत्यूने कवेत घेतल्याने खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ राहणारे पिसुरड्या शिंदे यांना बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील विद्युत वायरमध्ये आलेल्या प्रवाहाचा शॉक लागला. त्यांना वाचवण्यासाठी गंगुबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे हे तातडीने धावले. मात्र, दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह कसा आला, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, तसेच या प्रकरणात कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा काही क्षणांत झालेला मृत्यू ही घटना संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी हादरवून टाकणारी ठरली आहे. खामगाव गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांकडून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चौकट
प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात चौघांचा अंत
घरातील एका सदस्याला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी इतर तिघेही क्षणाचाही विलंब न करता धावले. मात्र, विद्युत प्रवाहाच्या विळख्यात तेही अडकले आणि मदतीसाठी धावलेले चारही जण मृत्यूमुखी पडले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण फलटण तालुका सुन्न झाला आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी
आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…






