आपलं फलटण (निंबळक प्रतिनिधी) आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देण्याबरोबरच इतर शेतकरी आणि युवकांनाही मार्गदर्शन करत दुग्ध व्यवसायात प्रगती करण्यासाठी प्रेरित करणारे राहुल सस्ते यांचे कार्य कौतुकास्पद असून ते इतरांसाठी आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार उद्योजक राम निंबाळकर यांनी काढले.
गोविंद डेअरीच्या माध्यमातून पंजाब राज्यातील आधुनिक दुग्ध व्यवसायाचा अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल निंबळक येथील रामालय निवासस्थानी राहुल सस्ते यांचा राम निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राम निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, निंबळक गावातील युवकांना आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी दोन एकर जागा स्वतःच्या मालकीची उपलब्ध करून देण्यास ते तयार आहेत. त्या ठिकाणी आवश्यक कंपाऊंड, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधा स्वखर्चाने उभारण्यात येतील. या जागेवर राहुल सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सत्काराला उत्तर देताना राहुल सस्ते यांनी पंजाब अभ्यास दौऱ्यातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले, “गोविंद डेअरीच्या माध्यमातून आम्हाला पंजाबमधील अत्याधुनिक दुग्ध व्यवसाय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. तेथील शेतकऱ्यांनी मुरघास (सायलेज) तयार करण्याची शास्त्रीय पद्धत, मक्याची योग्य वाढीच्या अवस्थेत कापणी करण्याचे तंत्र तसेच जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.”
ते पुढे म्हणाले, “पंजाबमध्ये एका गायीचे सरासरी दूध उत्पादन प्रतिदिन ४० लिटर इतके असून, काही गायी ७० लिटरपेक्षाही अधिक दूध देतात. त्याउलट महाराष्ट्रात बहुतांश गोठ्यांमध्ये सरासरी दूध उत्पादन १५ ते २३ लिटर असून, उत्कृष्ट गायीदेखील ३० ते ३५ लिटर दूध देतात. या तुलनेत आपण दुग्ध व्यवसायात पंजाबपेक्षा जवळपास वीस वर्षे मागे असल्याची जाणीव झाली. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक नियोजन आणि दर्जेदार व्यवस्थापन स्वीकारल्याशिवाय दुग्ध व्यवसायात अपेक्षित प्रगती शक्य नाही.”
यावेळी राहुल सस्ते यांनी अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. गायकवाड, डॉ. चव्हाण आणि डॉ. पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
पंजाबच्या आधुनिक दुग्ध व्यवस्थापनाचा अनुभव आणि तो फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यामुळे हा उपक्रम दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देणारा आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






