फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कृषी महाविद्यालय, फलटणच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी घाडगेमळा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, वाढते हवामान बदल, प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात ग्रामस्थ, शेतकरी आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून हरित व स्वच्छ भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित झाली.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नीतिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कृषीदूत सिद्धेश गोड, रोहन शिंदे, प्रणव जगताप, मोहित हंबीर, रुतुराज केदारी, अथर्व जाधव आणि चैतन्य केसकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम घाडगेमळ्यातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.






