फलटण :आपलं फलटण:
गोखळी (ता. फलटण) : सहकार क्षेत्रासमोर अनेक आर्थिक आव्हाने उभी असताना, प्रतिकूल परिस्थितीच्या वादळातही गोखळी येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आपल्या यशस्वी वाटचालीची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. संस्थेने उत्तम आर्थिक तरलता राखली असून सभासदांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले आर्थिक नियोजन आणि काटेकोर व्यवस्थापन कौतुकास्पद आहे. राज्यातील आदर्श पतसंस्थांमध्ये गोखळीच्या श्रीराम पतसंस्थेचा प्राधान्याने उल्लेख केला जातो, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी काढले. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीमागे संस्थापक संचालक सहकाररत्न डॉ. शिवाजीराव गावडे यांची दूरदृष्टी, सहकार क्षेत्राविषयीची बांधिलकी, अत्यंत काटकसरीचे आर्थिक व्यवस्थापन आणि सभासदांच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य महत्त्वाचे ठरले आहे.

त्यांनी लावलेल्या सहकाराच्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आदर्श संस्था म्हणून श्रीराम पतसंस्थेने आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका भारतीताई मुथा, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहाय्यक निबंधक दाजी खताळ, क्रांती शितोळे, माजी प्रादेशिक उपसंचालक जे.पी. गावडे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत, जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक बीएच क्षीरसागर, यांच्यासह सहकार, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील अनेक संस्था आर्थिक अडचणी, कर्जवसुलीतील आव्हाने आणि ठेवीदारांचा विश्वास टिकविण्याच्या समस्यांना सामोरे जात असताना श्रीराम पतसंस्थेने मात्र आर्थिक शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत काटकसरीचे व्यवस्थापन, नियोजनबद्ध आर्थिक व्यवहार, योग्य कर्जवाटप, वेळेवर कर्जवसुली, ठेवींची सुरक्षितता आणि पारदर्शक कारभार या तत्त्वांवर संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थापक डॉ. शिवाजीराव गावडे यांनी सुरुवातीपासूनच संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त आणि विश्वासार्हतेला महत्त्व दिले. संचालक मंडळाच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानातून संस्थेने प्रतिकूल परिस्थितीतही आपली आर्थिक घडी भक्कम ठेवली. संस्थेची २५ वर्षांची वाटचाल ही केवळ आर्थिक प्रगती नसून सहकार मूल्ये आणि सभासदांचा विश्वास जपणारी यशोगाथा असल्याचे मत काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले.
श्रीराम पतसंस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनाचे विशेष कौतुक करून कोयटे पुढे म्हणाले पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत केवळ आर्थिक उलाढाल महत्त्वाची नसून संस्थेकडे असलेल्या ठेवींचे योग्य नियोजन, आर्थिक तरलता राखण्याची क्षमता आणि सभासदांच्या पैशांच्या सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य अधिक महत्त्वाचे असते. श्रीराम पतसंस्थेने या सर्व बाबींचा उत्तम समतोल साधला आहे. संस्थेने आपली तरलता उत्तम राखली असून ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घेत आर्थिक नियोजन केले आहे. आर्थिक शिस्त आणि काटेकोर व्यवस्थापनामुळेच संस्थेने सहकार क्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. राज्यातील सर्वोत्तम पतसंस्थांमध्ये या संस्थेचा प्राधान्याने उल्लेख होणे ही अभिमानाची बाब आहे. संस्थापक डॉ. शिवाजीराव गावडे यांची दूरदृष्टी, संचालक मंडळाचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळेच संस्थेला हे यश मिळाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

सहकार दिनाचे औचित्य साधून आयोजित या रौप्यमहोत्सवी सोहळ्याची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वडाच्या वृक्षांना पाणी घालून करण्यात आली. त्यानंतर फलटणचे सहाय्यक निबंधक दाजी खताळ, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे प्रास्ताविक करताना डॉ. विकास खटके यांनी २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सामाजिक कार्य, शैक्षणिक मदत, गरजू सभासदांना अल्प व्याजदराने कर्जपुरवठा, ठेवीदारांचे हित जपण्यासाठी केलेले प्रयत्न आणि संस्थेच्या प्रगतीत सहकार विभागासह विविध संस्थांचे लाभलेले सहकार्य यांची माहिती दिली. संस्थेच्या कार्यावर आधारित लघुपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला.
संस्थेच्या वाटचालीत आधुनिक तंत्रज्ञानाचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. नेटवर्क कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट महसूल अत्तर यांनी मोबाईल ॲप्लिकेशन आणि अद्ययावत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संस्थेचे व्यवहार अधिक गतिमान, पारदर्शक आणि विश्वासार्ह होत असल्याचे सांगितले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील भगत यांनी सभासदाच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्जखात्यासाठी दिली जाणारी आर्थिक मदत आणि अनुकंपा निधीच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आर्थिक व्यवहारांबरोबरच सभासदांच्या कुटुंबीयांच्या अडचणीच्या काळात संस्थेने आधार देणे ही सहकारातील माणुसकीची खरी जपणूक असल्याचे त्यांनी नमूद केले. सहाय्यक निबंधक दाजी खताळ यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात महिला सक्षमीकरणाचा विषय केंद्रस्थानी होता. या सत्राच्या अध्यक्षस्थानी सुरेखा लवांडे होत्या. पुण्यातील स्त्रीशक्ती महिला पतसंस्थेच्या प्रमुख क्रांती शितोळे आणि श्रीमंत सईबाई महाराज पतसंस्थेच्या प्रमुख श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी महिलांचे आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता आणि सहकार क्षेत्रातील महिलांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले. श्रीराम पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. सुरेखा लवांडे यांनी महिला उद्योग उपक्रमांतर्गत श्रीराम पतसंस्थेच्या महिला सभासदांना व्यवसाय प्रशिक्षण, मार्केटिंग आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने सभासदांच्या हिताला प्राधान्य देत १० टक्के लाभांश, वेळेत कर्जफेड करणाऱ्या सभासदांना १३ टक्के व्याज परतावा, तर कर्मचाऱ्यांना ३४ टक्के बोनस जाहीर केला. याशिवाय सर्व सभासदांना ट्रॅव्हलर बॅग, वेळेत कर्जफेड करणाऱ्या सभासदांना १६ भांड्यांचा डिनर सेट, तर महिला सभासदांना टी-शर्ट भेट देण्यात आले. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सभासदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या पसंतीस उतरला.

यावेळी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक घनश्याम येडे यांनी श्रीराम पतसंस्थेने आपल्या चित्रपट व्यवसायाच्या अडचणीच्या काळात केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रीराम पतसंस्थेने वेळेवर आर्थिक मदत केल्यामुळेच चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान देता आले. आपल्या व्यावसायिक जडणघडणीत या संस्थेचा महत्त्वपूर्ण वाटा असून संस्थेने दिलेले सहकार्य कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. संस्थेच्या मदतीमुळे अनेक सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावल्याच्या प्रतिक्रियाही सभासदांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित ढाळे यांनी केले. संस्थेचे संस्थापक डॉ. शिवाजीराव गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेच्या यशस्वी वाटचालीत संचालक मंडळ, कर्मचारी, कर्जदार, ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक या सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.





