फलटण : आपलं फलटण:
बुलढाणा येथे झालेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने सलग पाचव्या वर्षी सुवर्णपदक पटकावत फलटणच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक यशाची नोंद केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथील मैदानावर ही स्पर्धा पार पडली. राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ विभागांचे संघ सहभागी झाले होते.
मुधोजीच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत नागपूर विभागाचा ३-० गोलने पराभव केला. उपांत्य फेरीत मुंबई विभागावर १-० गोलने मात करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुणे विभागाला २-१ गोलने पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत वैभवी राहिगुडे हिने प्रत्येक सामन्यात निर्णायक गोल नोंदवत विजयात मोलाचे योगदान दिले. स्वरा वाघ, स्वरा चव्हाण, ईश्वरी फुले आणि स्वरांजली बोके यांनी आघाडी फळीत प्रभावी खेळ केला. तर आरोही नवले, नेहा कुंभार, सोनाक्षी सोनवणे, आराध्या सोनवणे आणि ईश्वरी शिरतोडे यांनी बचावफळीत भक्कम कामगिरी केली. गोलरक्षक राजवर्धिनी शिंदे हिनेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आराध्या तानवडे, अनया गायकवाड, सानिका गायकवाड, आराध्या ननावरे, आराध्या निंबाळकर आणि सबा सय्यद यांनीही संघाच्या यशात योगदान दिले.
संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, प्रशिक्षक सचिन धुमाळ आणि व्यवस्थापक धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. फिजिकल फिटनेस ट्रेनर ऋषिकेश पवार व विनय नेरकर, निवृत्त क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे आणि ज्येष्ठ हॉकीपटू सुजित निंबाळकर यांचे सहकार्य मिळाले.
या ऐतिहासिक यशाबद्दल माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय लोंढे, पूजा पाटील, स्कूल कमिटीचे पदाधिकारी, फ. ए. सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे व सदस्य, द हॉकी सातारा संघटनेचे पदाधिकारी तसेच फलटणमधील ज्येष्ठ खेळाडूंनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.






