फलटण : आपलं फलटण :
येथील दोन युवा नृत्यांगनांनी आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फलटणच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे. भक्ती किरणकुमार नाळे आणि अंकिता नितीन गांधी यांनी नृत्याच्या माध्यमातून आपल्या कलागुणांची चमक दाखवत सुवर्णपदकांसह ‘ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड’ पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे फलटणच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. किरणकुमार नाळे आणि प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजश्री नाळे यांची १५ वर्षीय कन्या भक्ती नाळे, तसेच शांतिकाका सराफ अँड सन्सचे व्यावसायिक नितीन शांतिलाल गांधी यांची कन्या अंकिता गांधी यांनी मे २०२६ मध्ये पुणे येथे आयोजित अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या (ABSS) राष्ट्रीय स्पर्धेत, तसेच नोव्हेंबर २०२६ मध्ये अंदमान-निकोबार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘ओपन एथनिक’ या नृत्यप्रकारात प्रभावी सादरीकरण केले. दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांच्या सादरीकरणाला सुवर्णपदक आणि ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने गौरविण्यात आले.
या यशामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही स्पर्धांतील नृत्यसादरीकरणाचे नृत्यदिग्दर्शन अंकिता गांधी यांनी केले. त्यांच्या कल्पक नृत्यरचनेला आणि भक्ती नाळे व अंकिता गांधी यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला परीक्षकांकडून गौरव प्राप्त झाला. विशेषतः स्वतः नृत्यांगना म्हणून सादरीकरण करण्यासोबतच नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत अंकिता यांनी आपली कलात्मक क्षमता सिद्ध केली.

अंकिता गांधी या फलटण येथील ‘द स्टार डान्स स्टुडिओ’च्या संस्थापक आहेत. त्यांनी श्यामक डावर अकॅडमीमधून नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून त्या प्रमाणित बेली डान्सर आणि झुंबा प्रशिक्षक आहेत. बॉलीवूड, सेमी-क्लासिकल आणि लोकनृत्य अशा विविध नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण व नृत्यदिग्दर्शनाचा त्यांना आठ वर्षांहून अधिक अनुभव आहे. नृत्यकलेतील सातत्यपूर्ण मेहनत, कल्पकता आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.
या स्पर्धांचे आयोजन करणारी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ (ABSS) ही २००५ पासून कार्यरत असलेली स्वतंत्र भारतीय सांस्कृतिक संस्था आहे. ऑगस्ट २०१७ पासून या संस्थेला युनेस्कोचा अधिकृत सल्लागार भागीदारीचा (Consultative Status) दर्जा प्राप्त आहे. संस्थेमार्फत २०१० पासून ‘ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येतो. नृत्य, संगीत, नाट्य आणि विविध कलाप्रकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि विविध देशांतील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

भक्ती नाळे आणि अंकिता गांधी यांच्या या यशामुळे फलटणच्या कला क्षेत्रातील प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होण्याची संधी मिळाली आहे. विशेषतः कमी वयात भक्तीने मिळवलेले यश आणि अंकिता यांनी नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शक म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या यशाचे फलटणकरांकडून अभिनंदन होत असून भविष्यातही त्यांच्या हातून नृत्यकलेची अशीच उल्लेखनीय सेवा घडावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.






