फलटण (आपलं फलटण ) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाच्या सुवर्णपदक विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या फलटण तालुक्यातील कोळकीच्या कन्या कु. ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिचा सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित हा सोहळा सायंकाळी ६ वाजता मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारतीय महिला हॉकी संघाच्या यशात योगदान देत ऋतुजाने देशाचा गौरव वाढविला आहे. तिच्या या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी फलटणकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. कोळकीच्या मातीत घडलेल्या या कन्येच्या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या गौरव सोहळ्याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ऋतुजा पिसाळ हिचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शहरातून भव्य मिरवणूक
सत्कार सोहळ्यापूर्वी दुपारी ३.३० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून ऋतुजा पिसाळ हिची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरवासीयांना आपल्या लाडक्या क्रीडापटूचे स्वागत करून तिचे अभिनंदन करण्याची संधी मिळणार आहे.
स्थानिक पातळीवरून आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रापर्यंत मजल मारणाऱ्या ऋतुजाचा गौरव हा केवळ एका खेळाडूचा सन्मान नसून, फलटण तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी क्षण ठरणार आहे. तिच्या यशामुळे हॉकीसह विविध क्रीडा प्रकारांत करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या नागरी सत्कार सोहळ्यास फलटण तालुक्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण तालुका क्रीडा समिती व महात्मा शिक्षक संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.






