फलटण : आपलं फलटण :
शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन रखडल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या महिलांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नियमित काम करूनही मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने संबंधित महिलांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना सकस व पोषणयुक्त आहार मिळावा, यासाठी या महिला सकाळपासून शाळेत उपस्थित राहून धान्याची तयारी, स्वयंपाक, विद्यार्थ्यांना भोजन वाढणे आणि भोजनानंतर स्वच्छता अशी विविध कामे करतात. विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी पार पाडताना स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी मात्र त्यांना संघर्ष करावा लागत आहे.
‘महिनाभर काम करतो, मग अर्ध्या महिन्याचे नव्हे तर पूर्ण महिन्याचे मानधन द्या!’
गेल्या दोन वर्षांपासून एप्रिल महिन्यात पूर्ण महिना आहार बनवूनही पंधरा दिवसांचेच मानधन मिळत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कामाच्या दिवसांनुसार पूर्ण महिन्याचे मानधन मिळावे, अशी संबंधित कर्मचाऱ्यांची नम्र मागणी आहे.
मानधन नेमके कधी जमा होणार, याबाबत वारंवार तारखा दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात मानधन मिळत नसल्याची तक्रारही संबंधित अनेक महिलांनी तसेच संघटनेने केली. शिक्षकांचे वेतन दरमहा होते, मग विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे मानधन दरमहा का होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लहान मुलांचा खर्च भागवायचा कसा?
अनेक महिला अत्यल्प मानधनावर कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. घरातील लहान मुलांच्या गरजा, किराणा, शिक्षण आणि इतर खर्चांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता असते. मात्र, मानधन वेळेवर मिळत नसल्याने उधारीवर घर चालविण्याची वेळ येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी शाळेतील शिक्षकांकडून तात्पुरते पैसे उधार घेऊन मानधन जमा झाल्यानंतर परत देण्याचा पर्यायही वापरला जातो.
शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महिलांच्या कामाची दखल घेत त्यांचे रखडलेले मानधन तातडीने जमा करावे, तसेच पुढील काळात मानधन नियमितपणे दरमहा मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक ओढाताण थांबविण्यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणेने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या ताटात वेळेवर आहार देणाऱ्या महिलांच्या घरात मात्र आर्थिक विवंचना कायम राहणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
लाडक्या बहिणींची परवड कधी थांबणार?
दसऱ्यापूर्वी पाच महिन्यांचे थकीत मानधन द्या; अन्यथा काम बंद आंदोलन!
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होते, मग तुटपुंज्या मानधनावर राबणाऱ्या महिलांची उपेक्षा का? विद्यार्थ्यांना वेळेवर आहार देण्यासाठी दिवसभर राबणाऱ्या या महिलांच्या घरात मात्र आर्थिक चणचण कायम आहे. मानधन रखडल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविताना त्यांची दमछाक होत आहे. ‘लाडक्या बहिणी’ केवळ योजनांपुरत्याच लाडक्या आहेत का, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. दसऱ्यापूर्वी पाच महिन्यांचे संपूर्ण थकीत मानधन जमा करावे, अन्यथा शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम बंद करून आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पूरक आहार, इंधन व भाजीपाल्याची देयकेही थकीत?
शालेय पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक आहारासाठी तसेच इंधन आणि भाजीपाल्यासाठी सुरुवातीला शिक्षकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. मात्र, या खर्चाची देयकेही वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. छोट्या शाळांमध्ये एक-दोन शिक्षक तात्पुरती आर्थिक व्यवस्था करू शकतात; मात्र मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये वारंवार एवढा खर्च उचलण्यास कोणीही तयार होत नाही. परिणामी, आहार व्यवस्थेचा खर्च भागविण्यासाठी शाळाप्रमुखांवर आर्थिक जुळवाजुळव करण्याची मोठी जबाबदारी पडत आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित खर्चाची देयके तातडीने अदा करावीत, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.






