आपलं फलटण: आर्थिक अडचणींच्या गर्तेतून मार्ग काढत श्रीराम सहकारी साखर कारखाना २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गळीत हंगाम सुरू करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. ठरावाच्या वेळी सभासदांनी हात उंचावून अनुमोदन देत टाळ्यांच्या कडकडाटात रामराजेंचा गौरव केला.
सभेला माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन शाहूराज भोसले, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, वैशालीताई कांबळे, ज्योतीताई मोरे, दत्ता बापू अनपट, श्रीराम बाजारचे चेअरमन जितेंद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, शिवसेना महिला आघाडीच्या सातारा जिल्हा प्रमुख रेशमाताई भोसले, फलटण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्यासह प्रमोद गाडे, विश्वासदादा गावडे, तानाजी गावडे, परशुराम तावरे, अशोक शिंदे, बाळासाहेब खलाटे, बबनराव घोरपडे, संचालक, अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न झाला : रामराजे
अभिनंदनाचा ठराव स्वीकारताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “या यशाचे श्रेय माझे नसून कारखान्याच्या सभासद व शेतकरी बांधवांचे आहे.” विरोधकांनी कारखान्यात राजकारण आणून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी केला. मात्र, सभासदांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. कारखान्याच्या नक्त मूल्यामध्ये वाढ होण्यास सभासदांच्या सहभागामुळे मदत झाली आणि त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या भवितव्यासाठी आता सभासदांनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. उर्वरित सभासदांनी नवीन शेअर्स घेऊन भांडवली सहभाग वाढवावा. हा कारखाना कोण्या एका व्यक्तीचा किंवा काही मोजक्या लोकांचा नसून सभासद शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात प्रत्येक सभासदाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे आवाहन रामराजे यांनी केले.
श्रीराम कारखाना सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : संजीवराजे

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला. मागील काळात कारखान्यासमोर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करून गळीत हंगाम सुरू करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी सभासदांना दिली. कारखान्याची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी व्यवस्थापनाबरोबरच सभासदांचा सहभाग महत्त्वाचा असून, भविष्यातही सर्वांनी एकजुटीने कारखान्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामराजेंच्या अभिनंदनाचा ठराव
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता बापू अनपट यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांनी ठरावास अनुमोदन दिले. उपस्थित सभासदांनी हात वर करून ठरावाला संमती दिली. त्यानंतर हार, श्रीफळ व शाल देऊन रामराजे यांचा सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सभासदांसमोर ताळेबंद वाचून दाखविला. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सभेचे सूत्रसंचालन संचालक संतोष खटके यांनी केले, तर आभार सुखदेव बेलदार यांनी मानले.
चौकट :
गळीत हंगामासमोर आर्थिक बळकटीचे आव्हान
श्रीराम कारखाना यंदा गळीत हंगामासाठी सज्ज झाला असला तरी कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्याचे आव्हान कायम आहे. सभासदांचा भांडवली सहभाग, नवीन शेअर्सची उभारणी आणि ऊस उत्पादक सभासदांचे सहकार्य या बाबी आगामी काळात कारखान्याच्या वाटचालीत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे केवळ हंगाम सुरू होणे नव्हे, तर कारखाना दीर्घकाळ सक्षमपणे चालविण्याचे आव्हान व्यवस्थापनासमोर आहे.






