आपलं फलटण (धुळदेव प्रतिनिधी )
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्याग, साधी राहणी आणि शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीतून समाजात शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांच्या कार्यातून लाखो विद्यार्थी घडले असून, कर्मवीरांचे कार्य म्हणजे माणसे पेरण्याचे कार्य होय, असे प्रतिपादन प्राचार्य रविंद्र येवले यांनी केले.
धुळदेव येथील श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात आयोजित १३९ व्या कर्मवीर जयंती समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी थोर देणगीदार विनय शेठ गांधी होते.
प्राचार्य येवले म्हणाले, जीवन सकारात्मकतेने जगले पाहिजे. हास्य जीवनाला निर्मळ बनवते. कर्मवीरांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संस्कार रुजविले. त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्राचार्य दत्तात्रय भिवरकर यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा, पायाभूत विकास तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत विद्यालयाची यशाची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमास विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सरपंच पूजाताई भिवरकर, चंद्रकांत जाधव, रविंद्र परमाळे, व्यंकटराव दडस, ॲड. सचिन महामुनी, डॉ. अभंग यांच्यासह शिक्षणप्रेमी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देणगीदार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. संदिप फडतरे यांनी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंतराव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन अभंग व अभय गावडे यांनी केले. सरला लव्हाटे यांनी बक्षीस वितरणाची जबाबदारी पार पाडली. सुरेश यादव यांनी आभार मानले.






