आपलं फलटण :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, कोल्हापूर येथे झालेल्या नेहरू विभागस्तरीय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, फलटणच्या संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयामुळे संघाची कोपरगाव येथे होणाऱ्या नेहरू राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्पर्धेत कोल्हापूर, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली, सांगली महानगरपालिका, इचलकरंजी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. उपांत्य सामन्यात मुधोजी हायस्कूलच्या संघाने सांगली महानगरपालिका संघाचा ६-० गोलफरकाने पराभव केला. अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघावर ४-० गोलफरकाने मात करत फलटणच्या संघाने विभागीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या संघाची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत याच संघातील खेळाडूने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्पर्धेत राष्ट्रीय हॉकी खेळाडू गायत्री खरात, अनघा केंजळे, सिद्धी केंजळे, वेदिका वाघमोरे, श्रद्धा यादव, श्रावणी राहिगुडे आणि साक्षी चव्हाण यांनी आक्रमक खेळ करत गोल नोंदविले. मधल्या फळीत मानसी पवार, गौरी हिरनवाळे, समृद्धी बनकर, नंदिनी शिंदे आणि श्रावणी ननावरे यांनी प्रभावी कामगिरी बजावली. बचावफळीत राष्ट्रीय खेळाडू अनुष्का केंजळे व मृण्मयी घोरपडे यांनी भक्कम बचाव केला, तर गोलरक्षक आरोही पाटील हिनेही उल्लेखनीय कामगिरी केली.
संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ आणि व्यवस्थापक धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. फिजिकल फिटनेस ट्रेनर ऋषिकेश पवार व विनय नेरकर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे तसेच ज्येष्ठ हॉकी खेळाडू सुजित निंबाळकर यांचेही सहकार्य मिळाले.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघाचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक राव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, तसेच प्रशालेचे शिक्षक, स्कूल कमिटीचे पदाधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, समितीचे सदस्य, ‘द हॉकी सातारा’ संघटनेचे पदाधिकारी व फलटणमधील ज्येष्ठ हॉकी खेळाडूंनी अभिनंदन केले.






