फलटण (आपलं फलटण विडणी प्रतिनिधी)
विडणी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त १४ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसरात होणाऱ्या या उत्सवात ग्रामस्थ व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सागरभैय्या अभंग यांनी केले आहे.
सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी श्रींचे आगमन होणार असून, मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी झी टॉकीज फेम ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे नगरकर यांची कीर्तनसेवा होणार आहे. बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी ह.भ.प. महादेव महाराज पळसदेवकर (सिद्धखेडचा राजा) यांचा भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी कुमार देवकाते प्रस्तुत ‘महा मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी विडणी गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी उत्सवाची सांगता विविध कार्यक्रमांनी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता लोकनियुक्त सरपंच यांच्या विद्यमाने ‘सौभाग्यवतींना लेणं-लुटा’ कार्यक्रम होईल. त्यानंतर महिलांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती व ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री ९ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत विडणीचे सर्व सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशभक्तांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.






