फलटण : (आपलं फलटण प्रतिनिधी )गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता अद्याप मिळाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. १०) फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना निवेदन देत, कारखाने सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता जमा करावा, अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखाना, स्वराज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड (उपळवे), शरयू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड (कापशी) आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (साखरवाडी) या चारही कारखान्यांना निवेदने देण्यात आली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना आतापर्यंत ३२०० रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. गतवर्षी कारखान्यांनी २०० रुपये अतिरिक्त देण्याचे मान्य केले होते. मात्र, साखरेच्या दरातील वाढ आणि कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या साखरेचा विचार करता आणखी ३०० रुपये वाढ देणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. त्यामुळे २०० रुपये अधिक ३०० रुपये असे एकूण ५०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता कारखाना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी सांगितले की, “मा. राजू शेट्टी यांच्या आदेशाने हे आंदोलन उभे केले आहे. शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजे. कारखाना सुरू होण्यापूर्वी ५०० रुपये प्रतिटन जमा झाले नाहीत, तर कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
मागणी मान्य न झाल्यास ऊस वाहतूक बंद, साखर उचल बंद तसेच कारखाना गेटवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार व प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
श्रीराम जव्हार कारखान्याचे निवेदन चंद्रकांत तळेकर. स्वराज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे निवेदन शेतकी अधिकारी प्रदीप मोहिते, शरयू ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे निवेदन पाटील यांनी, तर दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडीचे निवेदन अजित जगताप यांनी स्वीकारले.
यावेळी प्रमोद गाडे, डॉ. रवींद्र घाडगे, किरण भोसले, विक्रम पवार, बाळासाहेब शिपुकले, अजित लाळगे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






