फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा) : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर फलटण येथे सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी केली.
महाराष्ट्रात मातंग समाजाची एकजूट होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून, आरक्षणाचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे म्हणाले, “आरक्षण उपवर्गीकरण हा संविधानिक न्यायाचा विषय आहे. वैचारिक मतभेद असले तरी कोणत्याही समाजाचा, महिलांचा अथवा महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. अपमान करणाऱ्यांचा इतिहास नोंद घेईल.”
परिषदेला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






