फलटण: (पोपट मिंड)
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलता, तक्रारींचे गांभीर्य आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संशयित दोषींची सखोल चौकशी करून नियमानुसार उचित कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर डॉ. रुपनवर यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या मूळ गावी फडतरी – मांडवे (ता. माळशिरस) येथे अंत्यविधीसाठी रवाना करण्यात आले.
डॉ. रुपनवर यांचे पार्थिव फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात तब्बल चार तास ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच नातेवाईक, फडतरी ग्रामस्थ, धनगर समाजबांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमले होते. वातावरणात दुःख, संताप आणि अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस
दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पार्थिव घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल होताच संतप्त जमावाने घोषणाबाजी सुरू केली. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात नेण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. नातेवाईक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये दोन-तीन वेळा तीव्र शाब्दिक वादाचे प्रसंगही घडले. “तुमच्या चुकीच्या भूमिकेमुळे आमचा राजेंद्र गेला,” अशा भावना काही नातेवाईकांनी संतप्तपणे व्यक्त केल्या.

“धनगराचा पोरगा आहे म्हणून न्याय मिळत नाही का?”
या आंदोलनादरम्यान एका नातेवाईकाचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाला भिडणारा होता. डोळ्यांत अश्रू आणि मनात प्रचंड वेदना घेऊन त्यांनी व्यवस्थेलाच सवाल केला.
“मग आमचा धनगराचा पोरगा आहे म्हणून त्याला न्याय मिळत नाही का? इथे पुढाऱ्याचा पोरगा असता तर मंत्री आले असते, मोठे अधिकारी आले असते. मेंढपाळाचा पोरगा आहे म्हणून अधिकारी येत नाहीत का? नेते येत नाहीत का? मंत्री येत नाहीत का? मेंढपाळाच्या पोरांनी शिकायचं नाही का? आताशी कुठे आमची मुलं शिकायला लागली आहेत, तर आमच्यावरच अन्याय होत आहे. गरिबाला न्याय मिळणार आहे का?” असा सवाल त्यांनी अश्रू अनावर होत व्यक्त केला.
हा सवाल केवळ एका कुटुंबाच्या वेदनेपुरता मर्यादित न राहता, समाजातील वंचित आणि ग्रामीण घटकांना प्रशासनाकडून समान संवेदनशीलता व न्याय मिळतो का, या व्यापक प्रश्नाला स्पर्श करणारा ठरला.

दरम्यान, माजी आमदार डॉ. रामहरी रुपनवर, नातेवाईक आणि सहकारी डॉक्टरांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी नातेवाईकांशी चर्चा केली.या प्रकरणात यापूर्वी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून आणखी पाच जणांविरुद्ध नव्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गोडसे यांनी दिली. तपासाची माहिती कुटुंबीयांना देण्यात येईल आणि कायद्यानुसार संशयितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रुपनवर कुटुंबीयांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे तातडीने पाठविण्यात येतील, असे प्रांताधिकारी आंबेकर यांनी सांगितले.

दरम्यान, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी रुपनवर कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांत्वन केले. सार्वजनिक आरोग्य विभाग कुटुंबीयांच्या पाठीशी असून घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे डॉ. कंदेवाड यांच्या पत्रात नमूद आहे.

रुग्णालयासमोरच अंत्यसंस्काराची तयारी
आंदोलनाची तीव्रता वाढत असताना काही नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्यासाठी सरपण आणले. त्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. मात्र, पोलिसांनी संयमी भूमिका घेत संवाद साधल्यानंतर आणि आरोग्य विभागाचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर पार्थिव फडतरीकडे रवाना करण्यात आले.
डॉ. रुपनवर यांच्या कुटुंबीयांनी संशयितांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, सेवेत असलेल्या दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी आणि प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाच्या कथित हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप माजी आमदार डॉ. रामहरी रुपनवर यांनी केला. तक्रारीनंतर वेळीच हस्तक्षेप झाला असता तर कदाचित डॉ. रुपनवर यांचे प्राण वाचले असते, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला. या दाव्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
डॉ. रुपनवर यांचे पार्थिव रुग्णालयाच्या आवारात चार तास राहणे, कुटुंबीयांचा आक्रोश, पोलिस प्रशासनाविषयी व्यक्त झालेला संताप आणि “गरिबाला न्याय मिळणार आहे का?” हा उपस्थित झालेला सवाल या संपूर्ण घटनेचे गांभीर्य अधोरेखित करणारा ठरला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणे, हीच आता कुटुंबीयांसह समाजाची अपेक्षा आहे.

‘उठून बसले अन् म्हणाले—मी आता ठीक आहे’; तासाभरात मृत्यूची बातमी!
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूभोवती संशयाचे गडद सावट; घातपाताच्या शक्यतेसह सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला होता, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. त्यांचे मामा त्यांना भेटण्यासाठी गेले असता डॉ. रुपनवर उठून बसले आणि ‘आता मी बरा आहे, तुम्ही निवांत जा, काळजी करू नका’, असे त्यांनी मामांना सांगितल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर मामा तेथून निघून गेल्यानंतर अवघ्या तासाभरात डॉ. रुपनवर यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.
या संपूर्ण घटनाक्रमामुळे कुटुंबीयांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माजी आमदार डॉ. रामहरी रुपनवर यांनीही या घटनाक्रमावर संशय व्यक्त केला आहे. ‘जो व्यक्ती काही वेळापूर्वी नातेवाइकांसमोर उठून बसतो, आपण ठीक असल्याचे सांगतो आणि त्यानंतर स्कॅनसाठी नेल्यानंतर तासाभरात मृत्यूची बातमी दिली जाते, हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद वाटतो,’ असे त्यांनी म्हटले.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूमागे नेमके काय घडले? उपचारादरम्यान काही अनपेक्षित प्रकार घडला का? घातपाताची शक्यता आहे का? या सर्व बाबींची निष्पक्ष, सखोल आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम तपासणी करून सत्य समोर आणावे, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.





