फलटण: आपलं फलटण
टाकळवडे, ता. फलटण येथील श्री महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थ, शिवभक्त आणि दानशूर देणगीदारांच्या सहकार्यातून पूर्णत्वास गेले असून,नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहण सोहळा रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात होणार आहे.
टाकळवडे ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत वर्गणी व लोकसहभागातून श्री महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. ग्रामस्थांच्या सामूहिक योगदानातून मंदिराचे काम पूर्ण झाल्याने गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. मंदिराच्या शिखरावर कलश नसल्यामुळे मंदिर अपूर्ण वाटत होते. ग्रामस्थांच्या संकल्पातून आता सुवर्ण कलशारोहण करण्यात येणार आहे.

या पावन सोहळ्यानिमित्त सकाळी ७ ते ११ वाजता होम, हवन व महापूजा, त्यानंतर ११ ते १ वाजता कलशारोहण सोहळा होणार आहे. दुपारी २ ते रात्री ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ ते ११ वाजता वडले भजनी मंडळ, वडले यांचे सुमधुर भजन होणार आहे.

ग्रामस्थांच्या श्रम, सहकार्य आणि लोकवर्गणीतून साकारलेल्या या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास परिसरातील भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळ, टाकळवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभ्या राहिलेल्या या धार्मिक वास्तूचा कलशारोहण सोहळा हा गावाच्या सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक ठरणार आहे.




