फलटण : आपलं फलटण प्रतिनिधी
फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण येथे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच पळून गेलेल्या पाच संशयितांपैकी दोघांना ऊसाच्या शेतातून व कुरवली तलाव परिसरातून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. तिघे संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मांडवखडक गावच्या हद्दीत हॉटेल बाणगंगाच्या बाजूला काही संशयित इसम रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच पाच संशयितांना पोलिसांची चाहूल लागली. त्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा सुमारे दोन किलोमीटर पाठलाग केला. यावेळी दोन संशयितांना ऊसाच्या शेतातून तसेच कुरवली तलाव परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लुटमार व चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
राहूल नाना घुले (रा. इंदिरानगर, फलटण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपींकडून फलटण ग्रामीण भागातील यापूर्वीच्या अनेक चोरी व लुटमारीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फरार तीन संशयित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस व तुषार नलवडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.





