फलटण | आपलं फलटण प्रतिनिधी
एखादया अभियंत्याचे कार्य केवळ नकाशे तयार करण्यापुरते मर्यादित नसते, तर शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहोचविणे, सिंचन व्यवस्था सक्षम करणे आणि विकासाची नवी दिशा निर्माण करणे हेही त्याचे महत्त्वाचे कर्तव्य असते. अशाच निष्ठावान, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख कार्याची राज्य शासनाने दखल घेत नीरा उजवा कालवा विभाग, फलटण येथील सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) धनंजय महादेव कोकरे यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०२२ चा ‘उत्कृष्ट अभियंता’ वैयक्तिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
जलसंपदा विभागातील उत्कृष्ट कामगिरी, तांत्रिक कौशल्य, प्रशासकीय कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि सिंचन प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे कोकरे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे जलसंपदा व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत झाली असून, शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक प्रकल्प प्रभावीपणे पूर्णत्वास गेले आहेत.
राज्य शासनाने जलसंपदा विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू केली असून, निवड झालेल्या अभियंत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. धनंजय कोकरे यांच्या सातत्यपूर्ण, परिणामकारक आणि प्रामाणिक सेवेमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने फलटण तालुक्यासह दुर्धेवी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल जलसंपदा विभागातील अधिकारी, सहकारी, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार केवळ त्यांच्या वैयक्तिक यशाचा सन्मान नसून, सार्वजनिक सेवेत गुणवत्ता, समर्पण, तांत्रिक प्राविण्य आणि प्रामाणिकपणाला मिळालेली राज्यस्तरीय मान्यताही आहे.
धनंजय कोकरे यांचे यश हे ग्रामीण भागातील तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल निश्चितच घेतली जाते, हा विश्वास या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे फलटणच्या नावात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.





